जांभवडे ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक शैक्षणिक निर्णय

मराठी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीकडून ५ हजारांची आर्थिक मदत!

घरपट्टी माफीसह शेती उपयोगी साहित्य देण्याचा निर्णय;

 जिल्हा परिषद शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी पालकांना आवाहन

स्वप्निल कदम l कुडाळ:      ग्रामीण भागातील मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढवून बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना नवसंजीवनी देण्यासाठी जांभवडे ग्रामपंचायतीने एक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. मराठी शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा सरपंच अमित मडव व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.

 

मराठी माध्यमातील शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने अनेक प्राथमिक शाळा बंद होण्याच्या स्थितीत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा गावातच उपलब्ध राहावी, तसेच मराठी शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावून त्यांना पुन्हा विद्यार्थी व पालकांचा विश्वास मिळवून देण्यासाठी जांभवडे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे.

 

या निर्णयानुसार मराठी शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ५ हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. याशिवाय शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मिळणारे ६ हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध होणार आहे. एवढ्यावरच न थांबता संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबाची ग्रामपंचायतीकडून घरपट्टी माफ करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू दरवर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

 

ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबावरील आर्थिक भार कमी होणार आहे. ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत प्रवेश देऊन या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

‘गावची शाळा वाचली तर गावचे भवितव्य घडेल’ या भूमिकेतून जांभवडे ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला बळ देणारा ठरणार आहे. शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासोबतच शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानसही ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे.

 

या वेळी सरपंच अमित मडव, ग्रामपंचायत सदस्य उदय मडव, शाऊ कदम, बाबा परेरा, उपसरपंच श्री. पावसकर, सौ. पिंटो तसेच गावातील विविध शाळांच्या शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे पालक व ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे.