निलेश साहेबांच्या शिलेदारावर मोठी जबाबदारी!

राणेंच्या विश्वासाची मोहर; स्वरूप वाळके युवासेना जिल्हाप्रमुखपदी

“निलेश साहेबांच्या विश्वासाला कामातून उत्तर देणार!” — स्वरूप वाळके

स्वप्निल कदम- कुडाळ :      युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देत आमदार निलेश जी. राणे यांनी युवा कार्यकर्ते स्वरूप वाळके यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची युवासेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवासेनेला नवे नेतृत्व आणि अधिक आक्रमक चेहरा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

 

तळागाळातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवत सामाजिक उपक्रम, जनतेचे प्रश्न आणि संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग घेणारे स्वरूप वाळके यांच्यावर आता संपूर्ण जिल्ह्यात युवासेनेची संघटनात्मक ताकद उभी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 

राणेंच्या विश्वासाला वाळकेंची साथ; संघटना मजबूत करण्याचे आव्हान

 

पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य वेळी जबाबदारी देऊन त्यांच्यावर विश्वास दाखविण्याची भूमिका आमदार निलेश राणे यांनी कायम ठेवली आहे. त्याच विश्वासातून स्वरूप वाळके यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे. ही केवळ पदाची नियुक्ती नसून नेतृत्वावर टाकलेली विश्वासाची मोठी जबाबदारी असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

 

आगामी काळात जिल्ह्यातील युवकांना संघटित करून युवासेनेची ताकद गावागावात, वाडी-वस्तीपासून बूथ पातळीपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान वाळके यांच्यासमोर असणार आहे. युवकांचे प्रश्न, स्थानिक समस्या तसेच सामाजिक विषयांवर सक्रिय भूमिका घेणारी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरणारी युवासेना उभी करण्यावर त्यांचा भर राहणार आहे.

 

“निलेश साहेबांच्या विश्वासाला कामातून उत्तर देणार!” — स्वरूप वाळके

 

“निलेश साहेबांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. पद मिळाले म्हणून थांबायचे नाही, तर या विश्वासाला आपल्या कामातून उत्तर द्यायचे आहे. जिल्ह्यातील प्रत्येक युवा कार्यकर्त्याला सोबत घेऊन युवासेना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. गावागावात संघटना मजबूत करून नव्या युवा नेतृत्वाला संधी देण्याचा माझा प्रयत्न राहील,” असा निर्धार युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांनी व्यक्त केला.

 

गावागावात युवासेनेची मजबूत फळी उभारणार

 

जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्ती आणि बूथ पातळीवर युवासेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्याचा निर्धार वाळके यांनी व्यक्त केला आहे. युवा कार्यकर्त्यांना संघटित करून त्यांना पक्षाच्या माध्यमातून काम करण्याची संधी देणे, नव्या चेहऱ्यांना नेतृत्वाची संधी उपलब्ध करून देणे आणि जिल्ह्यात युवासेनेची मजबूत फळी उभी करणे, ही आगामी काळातील प्रमुख उद्दिष्टे असणार आहेत.

 

दरम्यान, स्वरूप वाळके यांच्या नियुक्तीचे युवासेनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून स्वागत होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात युवासेनेच्या संघटनेला नवी ऊर्जा, धार आणि गतिमानता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.