शिधा वाटप व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
सावंतवाडी:
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सावंतवाडीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावंतवाडी नगरपरिषद व उपजिल्हा रुग्णालयातील सुमारे १२० कंत्राटी स्वच्छता दूत, तसेच शहरातील कष्टकरी भाजी विक्रेत्या ज्येष्ठ महिलांसाठी विशेष सन्मान, शिधा वाटप आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी दिली.
हा कार्यक्रम सोमवार, ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सावंतवाडी येथील गोविंद चित्रमंदिरच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्यापूर्वी ठीक ३ वाजता स्वच्छता दूतांसाठी मोफत मेडिकल कॅम्प सुरू होणार आहे. या शिबिरामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे डॉ. हर्ष ईश्वरा साळगावकर यांच्यामार्फत स्वच्छता दूतांची मोफत आरोग्य तपासणी, रक्त तपासणी तसेच धनुर्वाद प्रतिबंधक लस टोचणी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला निसर्गप्रेमी प्रसाद गावडे (रानमाणूस), सावंतवाडी शहरातील गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. उमेश मसुरकर आणि डॉ. हर्ष ईश्वरा साळगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्यात शहरातील ज्येष्ठ समाजसेवकांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सल्लागार व उद्योजक शैलेश पै, अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, सचिव समीरा खलील, खजिनदार रवी जाधव, रूपा मुद्राळे व लक्ष्मण कदम यांनी केले असून संस्थेचे सदस्य हेलन निबरे, शामराव हळदणकर, ॲड. अशोक पेडणेकर, शेखर सुभेदार, शरदिनी बागवे, सुजय सावंत, प्रा. प्रसाद कोदे आणि शरद पेडणेकर यांचे सहकार्य लाभले आहे. या सर्व उपक्रमाचा नगरपरिषद व रुग्णालयातील स्वच्छता दूतांसह नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी केले आहे.













