१९८ लाभार्थ्यांनी घेतला शिबिराचा लाभ;
विनायक भारती प्रतिष्ठानचा लोकहितकारी उपक्रम; ॲड. रजत चव्हाण यांचे ग्रामस्थांकडून आभार
स्वप्निल कदम – कुडाळ :
आपल्या लहानपणी कच्च्या रस्त्यांवरून धावणारी ‘लालपरी’ आज आधुनिकतेचे रूप धारण करत आहे. या लालपरीने आईप्रमाणे प्रत्येकाला साथ दिली असून, आज प्रत्येकाच्या दारासमोर खासगी वाहन असले तरी एस.टी.बद्दलचा जिव्हाळा कायम आहे, असे प्रतिपादन हिर्लोकचे तलाठी संतोष बांदेकर यांनी केले.
ग्रुप ग्रामपंचायत हिर्लोक-किनळोस आणि विनायक भारती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हिर्लोक येथे NCMC कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल १९८ लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला.
विनायक भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून २३० रुपये किमतीचे NCMC कार्ड ग्रामस्थांना केवळ ११५ रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले. कार्डच्या उर्वरित ११५ रुपयांचा खर्च प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आला. या सामाजिक उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी विनायक भारती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. रजत चव्हाण यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी उपसरपंच नरेंद्र राणे यांनी विनायक भारती प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक केले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. रजत चव्हाण यांनी, “आई-वडिलांप्रमाणे गावातील ग्रामस्थांची सेवा करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे,” असे मनोगत व्यक्त केले.
सेवा शक्ती एस.टी. संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भरत चव्हाण यांनी NCMC कार्डबाबत ग्रामस्थांच्या मनातील विविध गैरसमज दूर केले. १४ सप्टेंबरपर्यंत NCMC कार्ड काढण्याची मुदत असून, १४ ते ३० सप्टेंबरदरम्यान कार्ड काढल्याची पावती दाखविल्यास प्रवाशांना एस.टी.च्या सवलतींचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर सर्व प्रवाशांसाठी NCMC कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. संपूर्ण महाराष्ट्रातील नेटवर्क एकाच सर्व्हरवर अवलंबून असल्याने सर्व्हरवरील वाढलेल्या भारामुळे कार्ड नोंदणी करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये होणारे वाद कमी करण्यासाठीही हे कार्ड उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी सरपंच उदय सावंत यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून सर्व ग्रामस्थांनी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या NCMC कार्डचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य अश्विनी सावंत, सरपंच प्राची सावंत, उपसरपंच नरेंद्र राणे, प्रगतिशील शेतकरी हरिश्चंद्र ऊर्फ बबन कदम, तंटामुक्ती समिती अध्यक्ष विजय परब, माजी उपसरपंच मोहन परब, हिर्लोक सोसायटी अध्यक्ष पंढरीनाथ सावंत, उपाध्यक्ष विनोद सावंत, माजी उपसरपंच सूर्यकांत नाईक, गणेश चव्हाण, सीताराम परब, आदेश परब, संदीप सावंत, राघोबा परब यांच्यासह हिर्लोक-किनळोस ग्रुप ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी संतोष बांदेकर यांनी केले, तर आभार उपसरपंच नरेंद्र राणे यांनी मानले.













