पाणी जपून वापरा; टंचाई रोखण्यासाठी आतापासूनच कृती करा!…

वेंगुर्ले मध्ये केवळ ६७ टक्के पाऊस : कच्चे बंधारे घालून तत्काळ पाणी अडविण्याच्या तहसीलदार यांच्या सूचना..

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले तालुक्यात यंदा सरासरी केवळ ६७ टक्के पाऊस झाला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद वेंगुर्ल्यात झाली आहे. आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता जाणवू नये यासाठी नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. ग्रामपंचायतींनी आतापासूनच कच्चे बंधारे घालून व पक्के बंधारे दुरुस्त करून पाणी अडविण्याच्या उपाययोजनांना सुरुवात करावी, असे आवाहन तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केले.

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात सोमवारी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण बैठक झाली. यावेळी पाणीटंचाईच्या संभाव्य परिस्थितीबाबत तहसीलदार ओतारी यांनी उपस्थित सरपंच व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केले.

आडेली धरणात केवळ ३० टक्के पाणीसाठा
तालुक्यातील बंधारे उघडे असल्यास ते तातडीने बंद करून पाणी अडवावे. आडेली धरणात सध्या केवळ ३० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आजूबाजूच्या भागातील पाणीसाठे टिकविण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. तालुक्यातील ९५ पक्क्या बंधाऱ्यांपैकी नादुरुस्त बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी अंदाजपत्रके सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

५० टक्क्यांहून अधिक भातशेतीचे नुकसान
अनियमित पावसामुळे तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काही भागांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, तालुकास्तरावर शेतात जाऊन पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे.

निधीसाठी अंदाजपत्रके तयार करण्याचे आदेश
पाणीटंचाई रोखण्यासाठी आवश्यक कामांची अंदाजपत्रके तयार करण्याचे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले असून, या कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या समाजोपयोगी कामात ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी सहकार्य करून एकत्रितपणे पाणीटंचाईवर मार्ग काढुया. तसेच उपलब्ध पाणीसाठे वाचविण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे तहसीलदार ओतारी यांनी सांगितले.

बैठकीला सरपंचांची उपस्थिती
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, संजय गावडे, सुजाता पडवळ, कृषी अधिकारी श्री. शिवतारे, श्री. शिंदे, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, मेढा सरपंच अवधूत रेगे, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील, दाभोली सरपंच उदय दाभोलकर, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, उपसरपंच हाड्ये, तुळस सरपंच रश्मी परब, पाल सरपंच कावेरी गावडे, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, कमलेश गावडे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.