जय हनुमान कांगणेवाडी देवरूख गोविंदा पथकाने दिली ७ थरांची सलामी
देवरूख (प्रतिनिधी):
गोविंदा रे गोपाळा..यशोदेच्या तान्ह्या बाळा या जयघोषात संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहरात शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस ((अजितदादा गट) तर्फे आयोजित करण्यात आलेला दहिहंडी उत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या राजकीय पक्षांनी उभारलेल्या दहिहंड्यांना विविध गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचत सलामी दिली. या मानवी मनोऱ्यांचा थरार अनुभवत नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत दहीहंडीचा मनमुराद आनंद लुटला. तर थरांची सलामी दिल्यानंतर आयोजकांतर्फे गोविंदा पथकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहिहंडीला आमदार शेखर निकम व त्यांची पत्नी जि. प. सदस्या पूजा निकम यांनी उपस्थित राहून गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. तर जय हनुमान कांगणेवाडी देवरूख गोविंदा पथकाने ७ थरांची सलामी देत उपस्थित नागरिकांची वाहवा मिळवली. गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर देवरूख शहरासह ग्रामीण भागातही दहीहंडीचा अभूतपूर्व थरार पाहायला मिळाला. ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या उंच हंड्या, डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि मानवी मनोरे रचताना लागलेली गोविंदांची कसरत यामुळे संपूर्ण देवरूख परिसर ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. तालुका व जिल्हाभरातून आलेल्या गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचत दहीहंडीला सलामी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ५ ते ७ थरांचे एकावर एक मानवी मनोरे रचून गोविंदांनी अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षिततेची काळजी घेत दहिहंड्यांना यशस्वी सलामी दिली. श्री सोळजाई गोविंदा पथक देवरूख, वरदान सोळजाई, अमृतनगर देवरूख, जयसांबा पूर, साई नवलाई आंबवली, जय हनुमान कांगणेवाडी देवरूख, बोटकेवाडी देवरूख, पाटगाव कुंभारवाडी, केदारलिंग काटवली, राधाकृष्ण साखळकोंड, नटेश्वर भोके, रत्नागिरी आदी गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचून धमाल आणली. दहीहंडीचा हा रोमांचक थरार पाहण्यासाठी देवरूखच्या मुख्य चौकांमध्ये आणि बाजारपेठेत नागरिकांनी व महिलांनी मोठी गर्दी केली होती. आकर्षक विद्युत रोषणाई आणि ढोल-ताशांच्या गजराने उत्सवाची रंगत अधिकच वाढवली. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी देवरूख पोलीसांनीही ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. एकंदरीत यंदाचा दहिहंहीचा उत्सव देवरूखात पारंपरिक उत्साहात, सुरक्षिततेचे भान ठेवून आणि मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.













