नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे सहकार्याचे आवाहन
कणकवली:
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने अत्यंत व्यापक पातळीवर नियोजन सुरू केले आहे. शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे, रस्त्यावरील व्यवसाय आणि वाहने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ठेवणे तसेच प्रशासनाने आखलेल्या वाहतूक आराखड्याला पूर्ण सहकार्य करणे, अशा कडक व स्पष्ट सूचना नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी स्थानिक विक्रेते, व्यापारी आणि वाहनचालकांना दिल्या आहेत.
याच नियोजनाचा भाग म्हणून सोमवारी नगरपंचायत प्रशासनाच्या पथकाने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून मोहीम राबवली. मंजुनाथ हॉटेल ते कणकवली बस स्थानक आणि डीपी रोड ते झेंडा चौक या मुख्य मार्गांवरील दोन्ही बाजूंना असलेल्या सर्व दुकानदारांना, स्टॉलधारकांना, विक्रेत्यांना व वाहनधारकांना प्रत्यक्ष भेटून शिस्तीचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. या मोहिमेत नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह नगरसेविका दीपिका जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी गौरी पाटील, नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, ध्वजा उचले, सोनाली खैरे, सचिन नेरकर, रवी महाडेश्वर, विभव करंदीकर, अक्षता रोळे, मनोज तोरसकर, महेश राणे, संतोष राणे, रणजित उबळकर, जयश्री ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव आणि नगरपंचायतीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकणातील सर्वांत मोठा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी दरवर्षी मुंबई, पुण्यासह विविध भागांतून लाखो चाकरमानी, पर्यटक आणि भाविक सिंधुदुर्गात दाखल होतात. या काळात मध्यवर्ती केंद्र असलेल्या कणकवली शहरात वाहनांची प्रचंड वर्दळ वाढून वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडतो. ही बिकट परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आधीपासूनच पूर्वतयारी सुरू केली आहे. यापूर्वी नगरपंचायत प्रशासन, व्यापारी संघटना, ज्येष्ठ नागरिक, नगरसेवक, विविध पदाधिकारी आणि संबंधित सरकारी विभागांच्या अधिकाऱ्यांची जवळपास दोन तास महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत शहरातील अतिगर्दीच्या व अरुंद रस्त्यांवर ‘वन-वे’ (एकतर्फी वाहतूक) व्यवस्था लागू करणे, काही मार्गांवर सम-विषम (Odd-Even) पद्धतीने वाहने पार्क करणे तसेच दुचाकी, चारचाकी, रिक्षा आणि व्यापाऱ्यांच्या मालवाहू वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात आले.
या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन, पोलीस दल आणि संबंधित विभागांनी संयुक्तपणे शहरातील प्रमुख मार्गांची पाहणी केली. शहरातील सुमारे आठ गर्दीच्या आणि संवेदनशील रस्त्यांवर वाहतुकीचे नियंत्रण कसे मिळवायचे, नेमकी कोणती ठिकाणे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरतात आणि त्यावर कोणती प्रभावी उपाययोजना करता येईल, याचा सखोल आढावा घेण्यात आला. या संपूर्ण मोहिमेदरम्यान भाजी विक्रेते, फळ विक्रेते, छोटे व्यावसायिक, मोठे व्यापारी, रिक्षाचालक आणि सर्वसामान्य वाहनधारकांशी थेट संवाद साधून गणेशोत्सव काळात गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
सोमवारी राबवण्यात आलेली ही मोहीम दंडात्मक कारवाईसाठी नसून नागरिकांना व व्यापाऱ्यांना प्रशासनाची भूमिका समजावून सांगण्यासाठी आणि सहकार्याची विनंती करण्यासाठी होती, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या मोहिमेचा पुढील टप्पा येत्या गुरुवारी राबवण्यात येणार असून शहरातील उर्वरित भागात जनजागृती केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने कणकवलीची मुख्य बाजारपेठ, जुना रस्ता आणि वृषाली हॉटेल परिसरासारख्या अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी जाऊन व्यापारी व नागरिकांना वाहतूक नियोजनाबाबत आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या जातील.
गणेशोत्सव अत्यंत आनंदात, उत्साहात आणि कोणत्याही वाहतूक कोंडीशिवाय सुखकर रीतीने पार पडावा यासाठी सर्व कणकवलीकरांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पुन्हा एकदा केले आहे. तसेच उत्सव काळात नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात असले, तरी अनंत चतुर्दशीचा सोहळा पार पडल्यानंतर नगरपंचायत प्रशासन नियम मोडणाऱ्यांवर आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्यांवर आवश्यक ती पुढील कडक कारवाई करेल, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.













