गणेशोत्सवात कलमठ-आचरा मार्गावर अवजड वाहतूक बंद करा

 

 

जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री यांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

 

कणकवली : गणेशोत्सवाच्या काळात कणकवली-कलमठ-आचरा या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवावी, अशी मागणी कलमठच्या जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री यांनी कणकवली पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

गणेशोत्सवानिमित्त कणकवली, कलमठ, आचरा तसेच लगतच्या ग्रामीण भागात मोठ्या संख्येने चाकरमानी व भाविक दाखल होतात. त्यामुळे या कालावधीत कणकवली-कलमठ-आचरा मार्गावर दुचाकी, चारचाकी वाहने, एसटी बसेस तसेच पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. हा मार्ग प्रमुख संपर्कमार्ग असल्याने गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढतो.

 

या मार्गाची रुंदी अनेक ठिकाणी मर्यादित असून कलमठ बाजारपेठेसह पुढील गावांमध्ये तीव्र वळणे आणि दाट मानवी वस्ती आहे. त्यामुळे अवजड वाहतूक सुरू राहिल्यास वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अरुंद रस्त्यावर अवजड वाहने समोरासमोर आल्यास वाहतूक अनेक तास ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण होते. याचा फटका चाकरमानी तसेच स्थानिक नागरिकांना बसतो.

 

गणेशोत्सव काळात भाविक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची रस्त्यांवर मोठी वर्दळ असते. त्यामुळे अवजड वाहनांमुळे संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेता वाहतुकीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुरळीत व्हावा, तसेच वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत कणकवली-कलमठ-आचरा मार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवावी, अशी मागणी सुप्रिया मेस्त्री यांनी निवेदनातून केली आहे.