आंबव पोंक्षे च्या अजिंक्य पोंक्षेना साहित्य संघाचा मानाचा पुरस्कार प्रदान

गौरव पोंक्षे | माखजन
संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावचे सुपुत्र आणि उदयोन्मुख गायक नट अजिंक्य दीपक पोंक्षे यांना रंगभूमी वरील मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा. गिरगांव मुंबई च्या साहित्य संघाचा डॉ. श्रीरंग आडारकर पुरस्कृत ‘नाट्य संगीत कलाकार पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांच्या हस्ते,आणि रंगभूमीवर वावरणाऱ्या दिग्गजांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.अ.ना.भालेराव सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा झाला.शाल,श्रीफळ,पुस्तक,प्रशस्तीपत्रक,रोख रक्कम अस ह्या पुरस्काराच स्वरूप होत.
आंबव पोंक्षे सारख्या ग्रामीण भाग जन्मलेल्या अजिंक्य पोंक्षे यांना संगीताची उपजतच जाण होती.छोटया छोट्या स्पर्धामध्ये भाग घेत आपला ठसा उमटवला.माध्यमिक शिक्षण माखजन इंग्लिश स्कूल माखजन येथे झाले.दिवंगत भजनी कलावंत दिपक पोंक्षे यांचे ते सुपुत्र.त्यानी लहान पाणी आपल्या वडिलांकडूनच संगीताचे धडे गिरवले.तर ज्येष्ठ बंधू संदेश पोंक्षे देखील प्रोत्सहान देत राहिले.
अजिंक्य पोंक्षे यांनी आपल्या सांगितिक प्रवासॊबतच गायक नट म्हणून मराठी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली.रत्नागिरी च्या खल्वायन मधून त्यानी रंगभूमीवर प्रवेश केला.राज्य नाट्य स्पर्धेत संगीत प्रितिसंगम,संगीत ताजमहाल या नाटकांसाठी रौप्य पदक मिळवले आणि अलीकडच्या ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ मधील बालगंधर्वांच्या प्रमुख भूमिकेमुळे महाराष्ट्रातील कानकोपऱ्यात पोहचले.त्यांच्या अवीट गायकीने नाट्यगृहात टाळ्यांचा कडकडाट होयला सुरवात झाली.वन्स् मोअर ची सातत्याने मिळणारी दाद अखेरीला,पुरस्कारा समीप घेऊन गेली.गिरगांव च्या साहित्य संघाचा पुरस्कार मिळणे हे रंगभूमीवरील कलाकारांसाठी, कामाची उच्चतम दाद मानली जाते.
अजिंक्य हे संगीतात एम.ए आहेत तर सांगितिक शिक्षण प्रसाद गुळवणी,डॉ.कविता गाडगीळ,सतीश कुंटे अशा गुरुंकडून शिक्षण घेतले. नाट्य संगीतातील विशेष मार्गदर्शन मकरंद कुंडले,विलास हर्षे यांचे कडे घेत आहे.दरम्यान या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, दिनेश पेंढारकर,रंगकर्मी अशोक समेळ,विजय गोखले आदिंसह कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर नाट्यप्रवेश,व नाट्य संगीताचा ‘स्मरण गाथा’ हा बहारदार कार्यक्रम झाला.पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या सौभाग्यवती सौ सानिका पोंक्षे देखील उपस्थित होत्या.
अजिंक्य पोंक्षे यांच्या यशाबद्दल पोंक्षे कुटुंबियांकडून,मित्रपरिवारातून,व सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.