लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचा शिक्षक दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम; शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान
खेड (प्रतिनिधी) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने खेड तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा ‘आदर्श गुरुवर्य पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. एम. आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, खेड येथे हा पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यामध्ये संस्कार, सामाजिक बांधिलकी, शिस्त, सर्जनशीलता आणि जीवनमूल्यांची रुजवण करणाऱ्या शिक्षकांचा या पुरस्काराच्या माध्यमातून गौरव करण्यात आला. खेड तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील एकूण १६ शिक्षकांची यासाठी निवड करण्यात आली.
एम. आय. बी. गर्ल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, खेडचे श्री. अल्ताफ मुसा करबेलकर, एम. आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सौ. मेहजबीन परवेज महाडिक, ज्ञानदीप विद्या मंदिर भडगावचे श्री. विनोद सुधाकर टेंबे, हाजी एस. एम. मुकादम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे श्री. हसनमियां अब्दुल समद रिफाई आणि एल. पी. इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे श्री. रामचंद्र विठ्ठल मसेकर यांचा पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये समावेश होता.
तसेच नवभारत हायस्कूल व ज्युनियर कॉलेज भरणेचे श्री. विलास सदानंद बेंद्रे, छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल जामगेचे श्री. आनंद सोमय्या हिरेमठ, श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेडचे श्री. विवेकानंद गोविंद कांबळे, एस. एम. इंग्लिश मीडियम स्कूल दस्तुरीचे श्री. सागर प्रमोद मोरे आणि एल. टी. टी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सौ. शितल सलील जागुष्टे यांनाही ‘आदर्श गुरुवर्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरोळी-मोरेवाडीचे श्री. राजेश रघुनाथ भागणे, जिल्हा परिषद शाळा आंबवलीच्या श्रीमती रसिका रमेश रेवाळे, श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल वेरळच्या श्रीमती भक्ती काशिनाथ घडशी, रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडचे श्री. बाळू दत्तात्रय राऊत, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे-बोरजचे श्री. प्रतिक परशुराम पवार आणि विश्वनाथ विद्यालय लवेलच्या सौ. स्मिता प्रकाश सरदेसाई यांचाही या वेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
दरम्यान, लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतानाच शिक्षकी पेशात उल्लेखनीय योगदान देणारे लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ला. सुरेश चिकणे, विद्यमान सचिव ला. उत्तम कांबळे आणि माजी खजिनदार ला. अनिल मोरे यांना लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने विशेष ‘आदर्श गुरुवर्य’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराचे पुरस्कर्ते ला. सुरेश चिकणे, माजी चेअरमन, माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, रत्नागिरी तसेच ला. उत्तम कांबळे, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती यांचाही क्लबच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करताना शिक्षकी पेशा हा समाजाच्या जडणघडणीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचे नमूद केले. शिक्षक आपल्या ज्ञानातून विद्यार्थ्यांना घडवितात, मात्र त्याचबरोबर अध्यापनामध्ये नवनवीन प्रयोग, संस्कार आणि सामाजिक जाणीव निर्माण करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक निष्ठेने आणि समर्पणाने देत असलेले योगदान समाजाच्या भविष्यासाठी मोलाचे असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
‘शिक्षक हा समाजाचा आदर्श दीपस्तंभ असून, त्याच्या ज्ञान आणि संस्कारांमुळे सक्षम पिढी घडते,’ असा गौरवोद्गारही यावेळी व्यक्त करण्यात आला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्याचा लायन्स क्लबचा हा उपक्रम उपस्थित शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमींसाठी विशेष कौतुकाचा विषय ठरला.
या कार्यक्रमाला ला. पंकज भाई शहा, चेअरमन, अण्णासाहेब बेहरे टेक्निकल इन्स्टिट्यूट, खेड, शमसभाई मुकादम, अध्यक्ष, अंजुमन ए तालीम शिक्षण संस्था, खेड, ला. हनीफ भाई घनसार, सचिव, अंजुमन ए तालीम शिक्षण संस्था, खेड, ला. मिलिंद तलाठी, सदस्य, सहजीवन शिक्षण संस्था, खेड, ला. प्रफुल्ल मोरे, शालेय समिती सदस्य, कनिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय तळे, माजी प्रांतपाल ला. वीरेंद्र चिखले, एम. आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. तिसेकर, एस. एम. इंग्लिश मीडियम स्कूल दस्तुरीचे चेअरमन श्री. नाडकर, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, महेंद्र शिरगावकर, ला. ज्ञानेश्वर मर्कड, ला. विवेक कदम, माजी अध्यक्ष ला. शंकर पार्ट, ला. विनोद मोरे यांच्यासह पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे कुटुंबीय आणि मोठ्या संख्येने शिक्षणप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. सुरेश चिकणे आणि ला. उत्तम कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ला. अनिल मोरे यांनी केले.













