खेड (प्रतिनिधी) : खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल. टी. टी. इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह मुख्याध्यापक ते शिपाई अशा विविध शालेय जबाबदाऱ्या स्वतः स्वीकारून शालेय कामकाजाचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका प्रभावीपणे साकारत अध्यापनाचा आनंद घेतला.
यानंतर प्रशालेच्या सभागृहात शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सुरेल ईशस्तवनाने झाली. समन्वयक सेबास्टियन जॉय सर यांच्या हस्ते भारताचे दुसरे राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जॉय सर, एल्सी मॅडम, प्रशालेचे मुख्याध्यापक जी. बी. सारंग सर तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पी. एस. कुडाळकर मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने विविध विषयांमध्ये उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या विद्यार्थी-शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच ‘इंडियन टॅलेंट सर्च एक्झामिनेशन’मध्ये स्टेट टॉपर ठरलेल्या कु. प्राची काळे हिचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात कु. फातिमा शेख, कु. रिहम नाडकर, कु. लायबा हमदुले, कु. फातिमा मुकादम, कु. प्राची काळे, कु. दाऊद परकार आणि कु. स्वरा देवरुखकर यांनी भाषणातून शिक्षकांचे आपल्या जीवनातील महत्त्व विशद केले. शिक्षकांमधून योगी सर, कवळे मॅडम आणि सुतार सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
पी. एस. कुडाळकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून मिळालेल्या शिकवणीचा आपल्या जीवनात अंगीकार करावा, असे आवाहन केले. मुख्याध्यापक जी. बी. सारंग सर यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अतूट नात्यावर प्रकाश टाकला. एल्सी मॅडम यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषणांचे तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे कौतुक केले. समन्वयक जॉय सर यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली.
संस्थाध्यक्ष अहमदभाई मुकादम, परवेज मुकादम, प्रेमळ चिखले, जयेश गुहागरकर, चंद्रकिरण वैद्य, माजिद खतीब, डॉ. पुष्कर नेने आणि विलीन पाटणे यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षक विशाल सर आणि प्रशालेची विद्यार्थिनी अस्मा मुकादम यांनी केले, तर आभार प्रदर्शन इकरा मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सायली मॅडम आणि आफरीन मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











