कोल्हापूर-शिरोळ साठी एकाच दिवशी चार बस रवाना
दापोली | प्रतिनिधी : श्रावणात एसटी संगे देवदर्शन या उपक्रमाअंतर्गत दापोली आगारातून विविध तिर्थस्थळांना भेटी देण्यासाठी मोठया प्रमाणात बस गाडयांचे नियोजन करण्यात आले असून त्याला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. दापोली आगारातून नृसिंहवाडी-कोल्हापूर दर्शन, नागपंचमी निमित्त बत्तीस शिराळा-ज्योतिबा दर्शन, श्रावणी सोमवार निमित्त मार्लेश्वर दर्शन या फेNयांचे नियोजन केलेले असून दि. 20 ऑगस्ट रोजी दापोली येथून एक दोन नव्हे तर तब्बल 3 बस गाडया एकाच वेळी औदुंबर, नृसिंहवाडी, शिरोळ, कोल्हापूर दर्शन फेरी साठी रवाना झाल्या. या बस गाडयांचा शुभारंभ दापोलीच्या आगार व्यवस्थापक सौ. रेश्मा मधाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सहाय्यक वाहतुक अधिक्षक मुनाफ राजापकर, चालक वाय.के.वराट, एस.बी.माने, एस.व्ही. वाघमारे, वाहक व्ही. बी. बागुल, ए.एस.पाटोळे उपस्थित होते. यावेळी कोकण एसटीप्रेमी संघटनेतर्फे एसटीचे अधिकारी व चालक-वाहक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना आगार व्यवस्थापक सौ. मधाळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री ना. एकनाथ शिंदे व एसटीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. शेखर चन्ने यांच्या संकल्पनेतून श्रावणात एसटी संगे देवदर्शन हा उपक्रम सुरू करण्यात आला असून रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक श्री. प्रज्ञेश बोरसे, विभागीय वाहतूक नियंत्रक श्री. सचिन सुर्वे, पालक अधिकारी श्री. कुलकर्णी, यांच्या पुढाकाराने दापोली आगारामध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आज दापोलीतून कोल्हापूर दर्शन फेरीसाठी 3 बस गाडया रवाना झाल्या असून बत्तीस शिराळा साठी एक बस रवाना झाली आहे. प्रवाशांचा उदंड प्रतिसाद या संकल्पनेला लाभला असून यापुढे आगारातर्फे मार्लेश्वर दर्शन, अक्कलकोट-तुळजापूर दर्शन, शिर्डा दर्शन, कुणकेश्वर-माणगाव दर्शन, आंबेजोगाई दर्शन, भीमाशंकर दर्शन, अकरा मारूती दर्शन, कोल्हापुर-आदमापूर दर्शन, कणेरी मठ दर्शन अशा विविध सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. या फेऱ्यांचे आगारातर्फे बुकींग सुरू असून एसटीच्या सर्व सवलती या फेऱ्यांना लागू करण्यात आल्या आहेत.










