चालत्या एसटीचा एक्सल तुटून संगमेश्वरमध्ये भीषण अपघात; शालेय विद्यार्थी जखमी, गणेशोत्सवाच्या धामधुमीत प्रवाशांचे हाल

संगमेश्वर:

गणेशोत्सवामुळे कोकणात प्रवाशांची तुडुंब गर्दी असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात एसटी बसचा भीषण अपघात घडला आहे. वाशी पुनर्वसन ते संगमेश्वर मार्गावर आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वाशी गोटलवाडी आणि सोनवडे या गावांदरम्यान हा अपघात झाला. चालत्या बसचा एक्सल अचानक निखळल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या मधोमध बंद पडली. सकाळची वेळ असल्याने बसमध्ये शालेय विद्यार्थी व नोकरदारांची मोठी गर्दी होती. या अपघातात एका शालेय विद्यार्थिनीला मुका मार लागला असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

अपघातग्रस्त एसटी बस रस्त्याच्या मधोमध आडवी झाल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून गणेशोत्सवाच्या गर्दीत प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. एसटी प्रशासनाकडून गणेशोत्सवात पूर्ण सज्जतेचे दावे केले जात असले, तरी मेकॅनिकल वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे गाड्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. निष्पाप प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या ढिसाळ कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून आढावा घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.