पंपांवर ‘नो सीएनजी’चे फलक
रत्नागिरी । प्रतिनिधी :
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी उसळली असून, लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावाकडे रवाना होत आहेत. मात्र, गावी परतणाऱ्या या चाकरमान्यांच्या आनंदावर सीएनजी तुटवड्यामुळे विरजण पडले आहे. महामार्गावरील बहुतांश पंपांवर सीएनजीचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने वाहनचालकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
पंपांवर ‘सीएनजी संपले’चे फलक
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी परिसरातील सर्वच पेट्रोल व सीएनजी पंपांवर सध्या “सीएनजी संपला आहे” असे फलक पाहायला मिळत आहेत. ज्या मोजक्या पंपांवर गॅस उपलब्ध आहे, तिथे वाहनांच्या अनेक किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तासनतास वाट पाहूनही गॅस मिळत नसल्याने गणेशभक्तांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रिक्षाचालक अडचणीत
दरवर्षी सणासुदीच्या आणि मोठ्या सुट्ट्यांच्या हंगामात सीएनजीचा हा कृत्रिम अथवा तांत्रिक तुटवडा वाहनचालकांना भेडसावत असतो. यंदाही हीच परिस्थिती उद्भवल्याने प्रवाशांसोबतच स्थानिक रिक्षा व्यावसायिक अक्षरशः होरपळून निघाले आहेत. सणासुदीच्या दिवसांत हक्काच्या कमाईचा काळ असतानाच सीएनजी उपलब्ध नसल्याने रिक्षाचालकांचा ऐन मोसमातील व्यवसाय ठप्प झाला असून, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.













