अंमली पदार्थ विक्री विरोधात कठोर कारवाईची मागणी

 

 

शिरोडा परिसरातील नागरिकांचे वेंगुर्ला पोलिसांना निवेदन

 

वेंगुर्ले : प्रतिनिधी

शिरोडा व वेंगुर्ला तालुक्यात अंमली पदार्थांच्या विक्री व सेवनाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिरोडा येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.

याबाबत जागृत नागरिकांनी वेंगुर्ला पोलिस निरीक्षकांना निवेदन देत अंमली पदार्थांच्या गैरप्रकारांविरोधात ठोस पावले उचलण्याची मागणी केली.

निवेदनात म्हटले आहे की, शिरोडा परिसरात अंमली पदार्थ विक्रीसंदर्भात पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. मात्र, अशा प्रकारचे गैरप्रकार पूर्णपणे थांबण्यासाठी सातत्याने तपासणी व कारवाई होणे आवश्यक आहे. अंमली पदार्थांमुळे तरुण पिढीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून, या प्रकाराला वेळीच आळा घालणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी नमूद केले.

अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक अथवा सेवन करणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

“अंमली पदार्थांच्या विळख्यात तरुण पिढी अडकू नये यासाठी पोलिसांनी कोणतीही हयगय न करता कठोर कारवाई करावी,” अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे. या अगोदर पण शिरोडा मध्ये मारहाण प्रकारणी वेळी शिरोडा पंचक्रोशी, वेळागर मध्ये तरुण मुले, नायजेरियन लोकांचा वाढता वावर व अंमली पदार्थ संदर्भात निवेदन देऊन कारवाई करण्याचे सूचना देण्यात आल्या होत्या.

निवेदनावर शिरोडा व परिसरातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पोलिसांनी या निवेदनाची दखल घेऊन परिसरात अंमली पदार्थविरोधी मोहीम अधिक तीव्र करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिरोडा येथील ग्रामस्थ मयुरेश शिरोडकर, अमित गावडे, मनोज उगवेकर,राहुल गावडे, चंद्रशेखर गोडकर, श्रीकृष्ण धानंजी, अभय बर्डे, सोमकांत सावंत, सुधीर नार्वेकर, संतोष मसूरकर, महादेव नाईक, आदी उपस्थित होते.