BREAKING : वॅगनर कार ची पुढील कारला पाठीमागून धडक, दोन्ही कार मधील तिघे जखमी 

मुंबई गोवा महामार्गावर वाकेड येथील घटना, जखमींवर लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू 

 

संतोष कोत्रे 

लांजा -: मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनआर कारने राजापूरच्या दिशेने पुढे जाणाऱ्या ट्रीबर‌ कारला पाठी

मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. मुंबई गोवा महामार्गावर वाकेड पुलावर आज शनिवारी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

दरम्यान , अपघातातील जखमींना जिजाऊ संस्थेच्या रुग्णवाहिकेतून तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वॅगनआर कार (एमएच ४६ एपी १९७४) मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जात होती, तर ट्रिबर हि कार(एमएच ४८ बीएच ८५५१) मुंबईहून राजापूरच्या दिशेने जात होती. वाकेड पुलावर वॅगनआर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने वॅगनआरने ट्रीबरला मागून धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून वॅगनआरमधील ध्रुव जितेंद्र मापारी (वय १६, रा. वेरली सडे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) याच्यासह ट्रिबर कारमधील उत्तम परशुराम मिस्त्री (वय ६१) आणि मंगला उत्तम मिस्त्री (वय ६०, दोघेही रा. कुंभवडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) हे तिघे जखमी झाले.

अपघातानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी मदतकार्य सुरू केले. जखमींपैकी दोघांना उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढण्यात आल्याने वाकेड पुलावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.