गणेशभक्तांकडून पारंपरिक सजावटीच्या साहित्याची खरेदी..
वेंगुर्ले : दाजी नाईक
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांनी आधुनिकतेसोबतच पारंपरिक माटवीच्या सामानाची खरेदी करीत आजच्या युगातही निसर्गात उपलब्ध होणाऱ्या विविध वनस्पतींची परंपरा जपली आहे. दरवर्षी माटवीच्या बाजाराला हमखास हजेरी लावणारा पाऊस यंदा गायब झाल्याने विक्रेत्यांची तारांबळ झाली नाही. पावसाचा व्यक्तेय नसल्याने गणेशभक्तांनाही व्यवस्थितरित्या बाजार करता आला.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र आनंदी आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. शरिवारपासूनच बाजारपेठेत दैनंदिन फळभाजी, पालेभाजीसोबतच सजाटवीचे साहित्य, पूजा साहित्य, फळे-फुले आदी विक्रीसाठी दाखल झाले होते. आकर्षक दिसणारे सजावटीचे साहित्य आणि विद्युत रोषणाईने लक्ष वेधून घेतले. गेले चार दिवस या सणासाठी लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. शनिवारी वेंगुर्ला बाजारपेठेत माटवीचे सामान विक्रीसाठी दाखल झाले होते. काही गणेशभक्तांनी शनिवारीच बाजारपेठेत येत माटवीच्या सामानाची खरेदी केली. तर रविवारी बहुसंख्य गणेशभक्तांनी हजेरी लावत विविध सामानांची खरेदी केली. यावेळी पावसाचे प्रमाण कमी असल्याने माटवीचे सामान कुजण्याचा प्रकार झाला नाही. त्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात माटवीचे सामान पहायला मिळाले. माटवीच्या सामानासोबतच पूजा साहित्य, फळे, फुले, फटाके आदी दुकानांमध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. साधारण १०० रूपयांपासून ते एक हजार रूपयांपर्यंत फुलांचे हार तसेच मोदक, करंज्या, लाह्रा आदी वस्तूही बाजारपेठेत विक्रीस आल्यास आहेत. या वस्तूंचीही भाविकांनी खरेदी केली. यावर्षी गणेश चतुर्थी दिवशीच हरितालिका व्रत असल्याने हरितालिकेच्या मूर्त्याही विक्रीस आल्या होत्या. तर गणेशोत्सवाप्रमाणेच गौरीचा सणही महिलावर्ग उत्साहाने साजरा करतात. या सणात “ओवसा” भरण्यासाठी लागणारी सुपं तसेच रवळी आदी साहित्य विक्रीसाठी आले आहेत.
फोटोओळी – 1) शनिवारपासूनच गणेशभक्तांनी कंदमुळे तसेच माटवीच्या सामानाची खरेदी केली.
2) बाजारात फुलांचे हार विक्रीस आले आहेत.
3) भाविकांनी फळांचीही खरेदी केली.
4) गौरी पूजनाचे साहित्यही विक्रीस आले आहे.
5) प्लास्टिकचे हार लक्ष वेधून घेत आहेत.
6) पंचखाद्यासाठी लागणारे लाह्रांचीही विक्री झाली.
7) भाविकांनी फटाक्यांचीही खरेदी केली. (छाया दाजी नाईक)











