चिखली-भोसरी ते दोडामार्ग चाकरमान्यांसाठी पाच लक्झरी बसेस

आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून गणेशभक्तांची सोय 

दोडामार्ग : सुहास देसाई

 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिखली-भोसरी परिसरातून दोडामार्ग तालुक्यातील आपल्या गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदा विशेष पाच लक्झरी बसेसची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे शेकडो गणेशभक्त चाकरमान्यांना आपल्या कुटुंबीयांसह गणेशोत्सवासाठी गावी पोहोचण्याची सोय झाली असून, या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे येथील आमदार महेश लांडगे, नगरसेवक निलेश नेवाळे तसेच दोडामार्ग तालुक्याचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते सुधाकर धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आला. शैलेश गवस आणि कृष्णा गवस यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या मूळ गावी येत असतात. मात्र प्रवासाच्या काळात होणारी गर्दी आणि वाहनांची कमतरता लक्षात घेऊन या पाच लक्झरी बसेसची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे चिखली-भोसरी परिसरातील नागरिकांना दोडामार्गकडे आरामदायी आणि सुरक्षित प्रवास करता आला.

आज सकाळी या बसेसद्वारे दोडामार्ग, झारेबांबर, भेडशी, तिलारी परिसरातील चाकरमानी आपल्या घरी सुखरूप पोहोचले. आपल्या कुटुंबीयांसोबत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वेळेत घरी पोहोचल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

यावेळी **“गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!”**च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. गणरायाच्या आगमनाने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांतता नांदो, अशी प्रार्थना करण्यात आली.

चाकरमान्यांसाठी करण्यात आलेल्या या विशेष बससेवेमुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला असून, गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी घेतलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.