गणेशोत्सवाची पूर्वतयारी पूर्ण; विसर्जन व्यवस्था आणि नागरी सुविधांवर भर; रत्नागिरी नगरपरिषदेचा दावा

रस्त्यांवरील खड्डे बुजवले; ६ फुटांपर्यंतच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन
मोकाट जनावरांची जबाबदारी दिली पशुपालकांवर
मोकाट कुत्र्यांबाबत ठोस उपाय नाहीत

रत्नागिरी ( प्रतिनिधी):
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाकडून शहरात व्यापक पूर्वतयारी करण्यात आली असल्याचा दावा रत्नागिरी नगर परिषदेने केला असून तसे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याधिकारी श्री. वैभव गारवे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांकडून प्राप्त झालेल्या विविध मागण्या, सूचना तसेच तक्रारींची तातडीने दखल घेत आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली असल्याचे यात म्हटले आहे.

त्या नुसार सणादरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

विसर्जन स्थळांवर चोख व्यवस्था :
गणेशमूर्ती विसर्जन प्रक्रिया सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक वातावरणात पार पडावी यासाठी नगरपरिषदेने विसर्जन घाटांवर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. विसर्जनाच्या वेळी नागरिकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या अधिकृत विसर्जन स्थळांचाच वापर करावा. तसेच विसर्जनस्थळी अनावश्यक गर्दी टाळावी, सार्वजनिक स्वच्छता राखावी आणि वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.

कृत्रिम तलावांचा वापर करण्याचे आवाहन :
पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्यासाठी आणि नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी ६ फूट व त्यापेक्षा कमी उंचीच्या पी.ओ.पी. (POP) गणेशमूर्तींचे विसर्जन नगरपरिषदेने तयार केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांमध्येच करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विसर्जन प्रक्रिया अधिक सुरक्षित व नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

मोकाट जनावरांवर नियंत्रणाचे निर्देश :
गणेशोत्सवाच्या दिवसांत शहरातील रस्त्यांवर भाविक व वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा वेळी रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे पशुपालकांनी आपली जनावरे रस्त्यांवर अथवा सार्वजनिक ठिकाणी मोकाट सोडू नयेत, अशी सक्त सूचना नगरपरिषद प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.