वाकेड येथील पादचारी पुलाचे काम तीन वर्षांपासून रखडलेले

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, ग्रामस्थ पालकांतून तीव्र संताप

संतोष कोत्रे
लांजा : गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम अखेरीस पूर्णत्वास गेले आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उभारण्यात येत असलेला वाकेड गावातील पादचारी पूल अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे हायवे प्रशासन आणि ठेकेदार कंपनी वाकेड येथील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे का? असा संतप्त सवाल पालक आणि ग्रामस्थांतून व्यक्त केला जात आहे .
मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या अनेक गावांपैकी लांजा तालुक्यातील वाकेड हे गाव आहे. रडत खडत का होईना परंतु २०२६ साल उजाडले आणि मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हे अखेर पूर्ण झालेले आहेत. मात्र वाकेड येथे विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात येत असलेला पादचारी पुल मात्र अद्यापही पूर्ण होऊ शकलेला नाही. या पुलासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला केवळ पिलर उभारण्यात आलेले आहेत. या ठिकाणी पिलर उभारण्यात आल्यानंतर लवकरच पादचारी पुल पूर्ण होईल अशी लोकांची अपेक्षा होती. मात्र जवळपास तीन ते चार वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी या ठिकाणी पादचारी पुल पूर्ण होऊ शकलेला नाही.
वाकेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुमारे ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महामार्गावरून दिवसभर वेगाने वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. अशा परिस्थितीत शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडताना मोठा धोका पत्करावा लागत आहे. पादचारी पूल पूर्ण झाल्यास विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांनाही सुरक्षितपणे महामार्ग ओलांडणे शक्य होणार आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून वाकेड येथील पादचारी पुलाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. तर एखादी दुर्घटना घडल्यानंतरच याबाबत महामार्ग प्रशासन आणि ठेकेदार कंपनीला जाग येणार काय? असा संतप्त सवाल पालकांतून व्यक्त केला जात आहे.