उमेदच्या माध्यमातून महिलांनी बनविलेली वस्तू,पदार्थ बाजारपेठेत.

ओटवणे (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान(उमेद) अभियानांतर्गत शासनाकडून महिलांना नवीन दिशा आणि नवी उमेद देण्याचं काम करण्यात येत असून प्रभाग संघाच्या माध्यमातून गावागावी महिलांना सक्षम बनविण्याचं काम सुरु आहे. माजगावं प्रभाग संघातही या अभियानाची चांगली घोडदौड सुरु आहे.सहा गावांच्या या समूहातील महिलांना नवी दिशा मिळाली आहे.शिवम प्रभाग संघ माजगाव प्रभागातून विविध पदार्थ वस्तू विक्रीस बाजारात आणल्या जात आहे सध्या गणेश चतुर्थीचा उत्सव असल्याने या प्रभागातील महिलांनी बनविलेले काजू मोदक तसेच विविध पदार्थ सध्या बाजारात विक्रीस उपलब्ध असून ग्राहकांच्याही पसंतीस उतरत आहेत. सिद्धिविनायक स्वयंसहायता समूह, उद्यम नगर, माजगाव येथील महिलांनी तयार केलेले स्वादिष्ट काजू मोदक विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

तसेच कोकण रत्न उत्पादक गट, उद्यम नगर, माजगाव यांच्या विक्री केंद्रामध्ये बचत गटातील महिलांनी तयार केलेली विविध उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

उमेद अभियानाच्या सहकार्याने मळगाव रेल्वे स्थानकावर स्टॉल उभारण्यात आला असून, या स्टॉलवर माजगाव प्रभागासह इतर प्रभागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये कापसाच्या वाती, फुल अगरबत्ती, विविध प्रकारचे पीठ, मोदक, फराळाचे पदार्थ, लाडू, पापड तसेच इतर घरगुती उत्पादने उपलब्ध आहेत.

महिलांनी मेहनत, कौशल्य आणि गुणवत्तेच्या जोरावर तयार केलेल्या या उत्पादनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उत्पादनांचे दरही वाजवी असून गुणवत्ता उत्तम आहे. या माध्यमातून महिला बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत असून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला हातभार लागत आहे.

नागरिकांनी उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देऊन महिलांच्या उद्योगांना प्रोत्साहन द्यावे व या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभाग संघ तसेच सर्व महिला समूहाकडून करण्यात आले आहे.