ओंकार संगीत भजन मंडळ आणि श्री कुळदेव प्रासा.भजन मंडळ च्या बहारदार कामगिरीला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद !
लोकनृत्य, फुगड्या, लोकगीते आणि पारंपारिक खेळांनी व लक्षवेधी प्रसादाने रात्री जागू लागल्या.
फोंडाघाट (कुमार नाडकर्णी) – विघ्नहर्ता गणेशाचा महाउत्सव सुरू झाला. आणि गावातील वाड्या- वाड्यावरील, टिपिकल कौलारू घरे, पाणंदी, पाणवठे,आणि बाजारपेठा चाकरमानींच्या लगबगीने जागा झाला. श्रद्धा- चैतन्य- कर्तव्य आणि उत्साहाला उधाण आले.घरे बोलू लागली. मित्रपरिवार आणि आप्तेष्टांच्या आपुलकीची ओढ,काही कालांतरानंतर का होईना ? दुरावा दूर होऊन, जाणिवेने एकत्र आली. आणि बाप्पाच्या सेवेसाठी सज्ज झाली…
त्यातच पहिल्या दिवसापासून पुजेसाठी साठी काका (गुरुजी) आणि भजनासाठी स्थानिक लोकप्रिय मंडळांकडे कार्यक्रमासाठी नोंदणी सुरू झाली. यामध्ये मारुती मेस्त्री यांचे ओंकार संगीत भजन मंडळ आणि तसेच कुलदेव प्रासा. भजन मंडळ आघाडीवर आहे. सत्यनारायण पूजा, पारंपारिक फुगड्या, भजन, यामुळे गौरी गणपती विसर्जनापर्यंत, परतीची ओढ लागण्यापूर्वी, उत्सव उदंड उत्साहात साजरा करण्याकडे, रजा नसलेल्या चाकरमान्यांची धावपळ सुरू आहे.बाजारात ओवशाचे साहित्य, भाजीपाला, मिठाई आणि त्याच बरोबर खवय्यांची पेठेमध्ये रेलचेल आहे. त्यामुळे सकाळचे वेळी,पेठ माणसांनी फुलून गेलेली असते …
सुप्रसिद्ध वारकरी गायक- वादक मारुती मेस्त्री यांच्या ओंकार संगीत भजन मंडळाला, पंचक्रोशीत भक्तीगीत, भावगीत, अभंग, भजन आणि गजर याला चांगली मागणी आहे. या मंडळात विजय सावंत, तुकाराम सावंत, चैतन्य बाणे, ऋतुराज मेस्त्री, गौरव भालेकर, अखिल सावंत, वैभव सावंत, सुनील सावंत, सागर ठाकूर यांची सुयोग्य साथ लाभली आहे..
श्री कुळदेव प्रासा.भ. मंडळ, कुळाचीवाडी-फोंडाघाट गणेशोत्सवाचे सर्व दिवस अनेक भजनांनी लोकांच्या पसंतीस उतरले आहे. बुवा संजय लाड यांची धुरा भार्गव लाड हे सांभाळत आहेत.तर लोकप्रिय मृदंगकार ज्येष्ठ धाकू मेस्त्री आणि झांजवादक मंगेश लाड लक्षवेधी आहेत. तसेच साथसंगत पेंडूरकरांचे प्रकाश व गणेश तर लाड कुटुंबियांचे रमेश, अरविंद, अरुण, रोहन, दिनेश, अशोक, बंटी, नामदेव इत्यादी सुरात करत आहेत..
आजच्या बदलत्या जमान्यात पुन्हा एकदा अबाल- वृद्ध- पुरुष- महिलांची लोककला लोपपावत चालली असताना, नवीन पिढी आणि जेनझी -युवाईची भजनाकडे ओढ व उपस्थिती पाहता, आपल्या लोककला, परंपरा यापुढेही आपली नवनवीन सोशल रुपे रसिकांच्या -जनतेच्या पसंतीस उतरत आहेत.—— हेही नसे थोडके!












