मंडणगड (प्रतिनिधी): कोविड-१९ महामारीच्या अत्यंत प्रतिकूल काळात स्वतः गर्भवती असतानाही नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका सौ. मोहिनी मंगेश मोहिते यांचा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी यांच्या वतीने गौरव करण्यात आला.
चिपळूण तालुक्यातील ढोक्रवली येथील बौद्ध विहार येथे सेवा संकल्प अभियानाच्या औचित्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे अंतर्गत उपकेंद्र मांडकीच्या कार्यक्षेत्रात आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत असलेल्या मोहिनी मोहिते यांनी कोविड काळात नागरिकांच्या आरोग्यविषयक जनजागृतीसह रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांची माहिती घेणे, प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सहकार्य करणे आणि नागरिकांना आरोग्यसेवेशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
स्वतः गर्भवती असतानाही आरोग्यविषयक जोखीम आणि वैयक्तिक अडचणींची पर्वा न करता त्यांनी बजावलेल्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन त्यांना शाल, पुष्पगुच्छ व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
यावेळी अभिजीत देवळेकर यांनी मोहिनी मोहिते यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले. कोविडसारख्या अभूतपूर्व संकटाच्या काळात स्वतःची आरोग्यविषयक जोखीम असतानाही त्यांनी समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी केलेली सेवा प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणपत गावकर, चिपळूण तालुका ग्रामीण महिला अध्यक्षा वैष्णवी राजे-शिर्के, बूथ अध्यक्ष गणपत राणीम, ग्रामपंचायत ढोक्रवलीच्या माजी सरपंच सलोनी गावकर, तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षा पूजा मांडवकर, अंगणवाडी सेविका शितल राणीम यांच्यासह पूर्वी गावकर, बाळ घवाळे, दिनेश घवाळे, महेंद्र वामणे, योगेश राणीम, अशोक मोहिते, सोमा राणीम, कृष्णा मोहिते, प्रशांत राणीम, दीपक मोहिते, दक्षता मोहिते, किरण कुंडूगळे आदी उपस्थित होते.
मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त ‘एक दिवा आशीर्वादाचा, विकसित भारताच्या संकल्पाचा, २५ वर्षांच्या सेवेच्या सन्मानाचा’ या उपक्रमांतर्गत ढोक्रवली येथे आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करून सेवा कार्याला अभिवादन करण्यात आले.
चिपळूण तालुका ग्रामीण महिला अध्यक्षा वैष्णवी राजे-शिर्के यांच्या निवासस्थानी १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हा उपक्रम झाला. यावेळी अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते, जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणपत गावकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद राजे-शिर्के, वैष्णवी राजे-शिर्के आणि राज राठोड सहभागी झाले.












