‘सागरी सीमा मंच’तर्फे आवाहनाद्वारे शहरवासीयांना साद
रत्नागिरी :
“आपली मांडवी… आपली जबाबदारी!” हा संदेश देत आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवसाच्या निमित्ताने रत्नागिरीच्या ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या मांडवी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सागरी सीमा मंच, रत्नागिरी’ यांच्या वतीने हे विशेष अभियान राबवले जात आहे.
मांडवी समुद्रकिनारा हा शहराची एक सुंदर ओळख आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. मात्र, अलीकडच्या काळात किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांकडून होणारी प्लास्टीकची व कचऱ्याची विल्हेवाट न लागणे तसेच इतर अस्वच्छतेमुळे या किनाऱ्याची सुंदरता धोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियाच्या युगात मांडवीच्या सौंदर्याची छायाचित्रे जशी वेगाने व्हायरल होतात, त्याचप्रमाणे अस्वच्छता आणि प्लास्टिकच्या कचऱ्याचे फोटोही जगभर पोहोचतात. यामुळे केवळ मांडवीचीच नव्हे, तर संपूर्ण रत्नागिरी शहराची प्रतिमा मलीन होत असल्याबद्दल आयोजकांनी चिंता व्यक्त केली आहे.
हा प्रश्न केवळ प्रशासनाचा नसून प्रत्येक रत्नागिरीकराच्या स्वाभिमानाचा आणि जबाबदारीचा आहे, यावर या आवाहनात भर देण्यात आला आहे. मांडवी किनाऱ्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी आणि त्याची स्वच्छता कायम राखण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन सागरी सीमा मंचाकडून करण्यात आले आहे.
अभियानाची सविस्तर माहिती:
दिनांक: २० सप्टेंबर २०२६
वेळ: सकाळी ७:३० ते ९:३०
स्थळ: मांडवी किनारा, रत्नागिरी
“कचरा करू नका… कचरा दिसला तर उचलूया!” हा संकल्प करत मांडवी स्वच्छ ठेवणे म्हणजे केवळ एक बीच स्वच्छ ठेवणे नसून आपल्या रत्नागिरीची ओळख, प्रतिष्ठा आणि पर्यटनाचे भविष्य सुरक्षित ठेवणे आहे, असा संदेश या मोहिमेच्या माध्यमातून दिला जात आहे.
“सुंदर मांडवी… स्वच्छ मांडवी… अभिमानाची रत्नागिरी!” हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून रत्नागिरीकरांनी या स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, अशी विनंती ‘सागरी सीमा मंच, रत्नागिरी’च्या वतीने करण्यात आली आहे.












