‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
ढोल-ताशांच्या गजरात पाच दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता
कणकवली : पाच दिवसांच्या गणेशोत्सवानंतर लाडक्या गणरायाला शुक्रवारी भक्तीपूर्ण, उत्साही आणि भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला. सकाळपासूनच घराघरांत विसर्जनाची लगबग सुरू होती. गणपती बाप्पाची आरती, पूजा करून फुलांनी सजविलेल्या वाहनांमधून तसेच पारंपरिक पद्धतीने गणरायाला विसर्जनासाठी नेण्यात आले. विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होताच ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया’, ‘एक, दोन, तीन, चार… गणपतीचा जयजयकार’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा ठेका, भजनांचे सूर आणि गणेशभक्तांचा जयघोष यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. गणरायाच्या मिरवणुकीत अबालवृद्धांसह महिला आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. काही ठिकाणी पारंपरिक भजने, आरती आणि नामस्मरण करण्यात आले. ढोल – ताशांच्या तालावर गणेशभक्तांनी उत्साहात सहभाग घेतला, तर बाप्पाच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली होती. विसर्जनस्थळी पोहोचल्यानंतर गणरायाची सामूहिक आरती करण्यात आली. यावेळी भक्तांनी सुख – समृद्धी, आरोग्य आणि सर्वांच्या मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
पाच दिवस बाप्पाच्या भक्तीत रंगलेल्या गणेशभक्तांच्या डोळ्यांत निरोपाच्या वेळी आनंदासोबतच विरहाची भावनाही दिसून आली. भक्ती, उत्साह आणि भावनिक वातावरणात झालेल्या विसर्जनाने पाच दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता झाली.











