‘एमव्ही रेक एलिट’वरील घटनेची जयगड सागरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद
रत्नागिरी : प्रतिनिधी
अरबी समुद्रात प्रवास करणाऱ्या ‘एमव्ही रेक एलिट’ या जहाजावर इजिप्तच्या नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना एप्रिलमध्ये घडली होती. या प्रकरणाची कागदपत्रे मुंबईतील यलोगेट पोलिस ठाण्याकडून रत्नागिरी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे प्राप्त झाल्यानंतर पुढील चौकशीसाठी ती जयगड सागरी पोलिस ठाण्याकडे पाठविण्यात आली आहेत. त्यानुसार जयगड सागरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
इस्लाम आदेल अहमद अब्देल लतीफ (३५, व्यवसाय—सुरक्षा अधिकारी, थर्ड ऑफिसर, ‘एमव्ही रेक एलिट’, रा. इजिप्त) असे मृत तरुण अधिकाऱ्याचे नाव आहे. ‘एमव्ही रेक एलिट’ हे जहाज १० एप्रिल २०२६ ला दुपारी दीड च्या सुमारास १४.१० उत्तर अक्षांश व ५५.२८ पूर्व रेखांश या ठिकाणी अरबी समुद्रात असताना ही घटना घडली होती.
या घटनेनंतर संबंधित जहाजावरील अधिकाऱ्यांकडून प्राथमिक वैद्यकीय कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटद-खंडाळा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून १६ एप्रिल २०२६ ला दुपारी पावणे एक च्या सुमारास ‘एमव्ही रेक एलिट’ या जहाजावरच वैद्यकीय कार्यवाही करण्यात आली.
दरम्यान, हे जहाज जयगड बंदर येथे दाखल झाल्यानंतर १७ सप्टेंबर २०२६ सकाळी साडे अकराला या घटनेची नोंद करण्यात आली. मृत व्यक्ती इजिप्तचा नागरिक असल्याचे पोलिस कागदपत्रांत नमूद आहे. घटनेचे ठिकाण यलोगेट पोलिस ठाणे, मुंबई यांच्या हद्दीत येत नसल्याने संबंधित आकस्मिक मृत्यूची कागदपत्रे तेथून रत्नागिरी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आली. पुढील चौकशीसाठी हे प्रकरण जयगड सागरी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्याचे आदेश मिळाल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास जयगड सागरी पोलिसांकडून करण्यात येत आहे.











