गणेशोत्सवासाठी मुंबई–सावंतवाडी विशेष गाड्या; १९ व २६ सप्टेंबरला मुंबईहून रवाना

सावंतवाडी–मुंबई विशेष गाडी २० व २७ सप्टेंबरला धावणार; कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबा

 

देवगड : प्रतिनिधी

 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या समन्वयाने मुंबई सीएसएमटी–सावंतवाडी रोड आणि सावंतवाडी रोड–मुंबई सीएसएमटी दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

 

मुंबई सीएसएमटी–सावंतवाडी रोड विशेष गाडी क्रमांक ०१००९ ही १९ आणि २६ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई सीएसएमटी येथून दुपारी १.४५ वाजता रवाना होईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

 

याचप्रमाणे सावंतवाडी रोड–मुंबई सीएसएमटी विशेष गाडी क्रमांक ०१०१० ही २० आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी सावंतवाडी रोड येथून पहाटे ४.०५ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचणार आहे.

 

या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

 

या गाडीला एकूण २२ डबे असून त्यामध्ये २ थ्री टियर एसी, १२ स्लीपर, ६ जनरल आणि २ एसएलआर/डी डबे असतील.

 

या विशेष गाड्यांचे सविस्तर थांबे व वेळापत्रक indianrail.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गणेशोत्सवाच्या काळातील वाढीव प्रवासी गर्दी लक्षात घेता प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.