निर्माल्यापासून तयार होणार खत, वृक्षसंवर्धनासाठी वापरण्याचा संकल्प
सावंतवाडी । प्रतिनिधी : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत स्तुत्य आणि अनोखा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. गणेश विसर्जनासाठी मोती तलावाच्या काठावर येणाऱ्या भाविकांना त्यांनी श्रीगणेशाचे निर्माल्य थेट पाण्यात न विसर्जित करता ते विशेष कलशात टाकण्याचे आवाहन केले. भाविकांनीही प्रतिष्ठानच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत निर्माल्य कलशात जमा केले.
या उपक्रमासाठी मोती तलावाच्या काठावर प्रतिष्ठानतर्फे एक विशेष कक्ष उभारण्यात आला होता. या कक्षात प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी उपस्थित राहून भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा करून घेतले. तलावाचे प्रदूषण रोखणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
जमा केलेल्या या सर्व निर्माल्याचा उपयोग खत निर्मितीसाठी केला जाणार आहे. प्रतिष्ठानच्या मुख्य केंद्रावर यासाठी विशेष खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून, गोळा केलेल्या निर्माल्यापासून तिथे सेंद्रिय खत तयार केले जाईल.
विशेष म्हणजे, हे तयार झालेले खत प्रतिष्ठानच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांना घालण्यात येणार आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच लावलेल्या वृक्षांचे योग्य संगोपन होण्यास मोठी मदत होणार आहे. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सावंतवाडीतील नागरिक व भाविकांमधून विशेष कौतुक होत आहे.












