हर्णै किनाऱ्यावर दोन ‘फिनलेस पॉर्पॉईज’ सापडले मृतावस्थेत

एक नर, तर दुसरे लहान पिल्लू; मृत्यूचे कारण अस्पष्ट, मोठ्या जहाजाचा धक्का किंवा जाळ्यात अडकल्याचा संशय

दापोली(प्रतिनिधी) :-समुद्राच्या अथांग पाण्यातील दुर्मीळ समुद्री सस्तन प्राण्यांचे अस्तित्व हर्णै किनाऱ्यावर पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हर्णै बंदरातील एम. एम. फिशरीजसमोर आणि हर्णै बायपाससमोरील समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी (ता. १७) इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉर्पॉईज या समुद्री सस्तन प्राण्यांचे दोन मृतदेह आढळून आले. यातील एक प्राणी नर जातीचा, तर दुसरे लहान पिल्लू असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन्ही प्राण्यांचा मृत्यू आठ ते दहा दिवसांपूर्वी झाला असण्याचा संशय असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हर्णै विभागाचे कांदळवन विभागाचे प्रमुख फहद जमादार यांना सकाळी हे दोन्ही मृत प्राणी आढळून आले. यातील एक मृतदेह हर्णै बंदरातील एम. एम. फिशरीजसमोर, तर दुसरा हर्णै बायपाससमोरील समुद्रकिनाऱ्यावर आढळला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद लोंढे यांनी घटनास्थळी दाखल होत बंदरात आढळलेल्या प्राण्याचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर दोन्ही प्राण्यांच्या मृत्यूचे नेमके कारण सांगणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मृतदेहांची अवस्था आणि मृत्यूला बराच कालावधी झाल्याचा संशय असल्याने मृत्यूचे कारण निश्चित करण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मृत प्राण्यांना समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत खड्डा करून तेथेच पुरण्यात आले. यावेळी खेडचे कांदळवन विभागाचे अधिकारी अक्षय ढाकणे, विश्वंभर झाडे, वनरक्षक सोनाली हसे, प्रभू साबणे, माजी ग्रामपंचायत सदस्या सना काझी, मुजम्मिल काझी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

फिनलेस पॉर्पॉईज हा डॉल्फिन नसून समुद्री सस्तन प्राण्यांच्या पॉर्पॉईज वर्गातील प्राणी आहे. त्याच्या पाठीवर डॉल्फिनप्रमाणे स्पष्ट पृष्ठीय पर नसतो, हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर या प्रजातीच्या नोंदी आढळतात. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही या प्राण्याच्या नोंदी यापूर्वी झाल्या आहेत.

हर्णै किनाऱ्यावर एकाच दिवशी दोन फिनलेस पॉर्पॉईज मृतावस्थेत आढळल्याने किनारी जैवविविधतेच्या दृष्टीने ही घटना महत्त्वाची मानली जात आहे. समुद्रातील मानवी हस्तक्षेप, मासेमारीची जाळी आणि जहाजांची वाहतूक यांचा समुद्री सस्तन प्राण्यांवर होणारा परिणाम यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे.