रत्नागिरी : प्रतिनिधी
जयगड ते नांदिवडे जाणाऱ्या मार्गावर जेएसडब्ल्यू कामगार वसाहतीसमोरील रस्त्यावर रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता क्रेन चालविल्याप्रकरणी चालकाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास नांदिवडे येथील जेएसडब्ल्यू कामगार वसाहतीसमोरील रस्त्यावर घडली. याप्रकरणी जयगड सागरी पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई शिवम प्रकाश आंबुलकर यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार,दीपचंद हरिश्चंद्र विश्वकर्मा ( २३, रा. रुधौली, सेमरियावां, संत कबीरनगर, उत्तर प्रदेश; सध्या जेएसडब्ल्यू लेबर कॉलनी, नांदिवडे) हा त्याच्या ताब्यातील क्रेन (क्रमांक एमएच ०९/जीएम ७९५६) घेऊन जयगड ते नांदिवडे जाणाऱ्या मार्गावरून प्रवास करीत होता. जेएसडब्ल्यू कामगार वसाहतीसमोरील रस्त्यावर आल्यानंतर त्याने रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता वाहन हयगयीने चालविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात १८ सप्टेंबर रोजी रात्री ८.२७ वाजता गुन्हा क्रमांक ७३/२०२६ नोंद करण्यात आला. भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २८१ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास जयगड पोलिस करीत आहेत.












