रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील गडनरळ चौकवाडी येथील रस्त्यावर खड्डा चुकविताना कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला. या अपघातात कारचेही नुकसान झाले. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
हा अपघात १२ सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वा.सुमारास गडनरळ चौकवाडी येथील रस्त्याच्या वळणावर घडला. या प्रकरणी प्रदीप पुनाजी वाघाडे ( ५७, रा. आदर्शनगर, वाटद-खंडाळा, ता. जि. रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, प्रदीप वाघाडे हे आपल्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो कारमधून साक्षीदार प्रेमचंद दयानंद ओझा व अनिल दत्तिच यांना घेऊन गडनरळ ते जयगड मार्गावरून प्रवास करीत होते. गडनरळ चौकवाडी येथे रस्त्यावर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाने कारवरील ताबा सोडला. त्यानंतर कार रस्त्याच्या उजव्या बाजूला जात असताना चालकाने स्टेअरिंग दुसऱ्या बाजूला वळविल्याने कार जागीच पलटी झाली.
या अपघातात तक्रारदार प्रदीप वाघाडे व साक्षीदार प्रेमचंद ओझा यांना गंभीर दुखापत झाली असून, कारचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी जयगड पोलिसांनी लिलाधर आत्माराम खाडे (रा. जयगड, सडेवाडी, ता. जि. रत्नागिरी) याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २८१, १२५(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जयगड पोलिस करीत आहेत.











