वेळास स समुद्रकिनारी ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत स्वच्छता मोहीम

मंडणगड :
‘सेवा संकल्प अभियान २०२६’ आणि ‘स्वच्छ भारत–निरोगी भारत’ या उपक्रमांतर्गत पंचायत समिती मंडणगड यांच्यावतीने २०सप्टेंबर २०२६ रोजी तालुक्यातील वेळास समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आयोजित करण्यात आली.
वेळास समुद्रकिनारी आयोजित स्वच्छता मोहिमेत अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला प्लास्टिक कचरा, बाटल्या तसेच इतर घनकचरा संकलित केला. संकलित कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी वर्गीकरण करण्यात आले.
समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली. ‘स्वच्छता ही सेवा – स्वच्छ समुद्रकिनारा, सुंदर पर्यावरण!’ हा संदेश देत नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सातत्याने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छतेमुळे पर्यावरण संवर्धनासोबतच पर्यटनाच्या दृष्टीनेही वेलास परिसराचे सौंदर्य जपण्यास मदत होणार आहे. ‘कचरा योग्य ठिकाणी टाका, प्लास्टिकमुक्त किनारा आणि स्वच्छ पर्यावरण’ या उद्देशाने भविष्यातही अशा उपक्रमांना चालना देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.