पन्नाशीनंतर नियमित आरोग्य तपासणी आवश्यक : डॉ. नंदादीप चोडणकर

सावंतवाडी वैश्यवाडा गणेशोत्सवात मोफत आरोग्य शिबिर संपन्न

सावंतवाडी । प्रतिनिधी :आपण पूर्णपणे निरोगी आहोत असा बहुतांश लोकांचा गैरसमज असतो. परंतु, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे गंभीर आजार नकळतपणे शरीरात बळावत असतात. या पार्श्वभूमीवर वयाची ठराविक वर्षे ओलांडल्यानंतर प्रत्येकाने नियमितपणे आपली आरोग्य तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदादीप चोडणकर यांनी केले.

वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात गणेशोत्सवानिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबीराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिर उत्सव समिती आणि राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘मुख्यमंत्री श्री गणेश आरोग्य अभियान’ अंतर्गत या मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दीपप्रज्वलनाने शिबीराचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना आयुर्वेद महाविद्यालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. विशाल पाटील यांनी सांगितले की, ‘विकसित भारत २०४७’ हे राष्ट्रीय मिशन यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सर्वप्रथम स्वतः निरोगी राहणे आवश्यक आहे. माजी सभापती तथा नगरसेवक आनंद नेवगी यांनी आपल्या मनोगतातून समाज निरोगी ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या आरोग्य उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे स्पष्ट केले. तर उत्सव समितीचे सचिव अण्णा म्हापसेकर यांनी प्रास्ताविक करताना वैश्यवाड्यात राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.

या शिबीरामध्ये डॉ. नंदादीप चोडणकर, डॉ. विशाल पाटील, डॉ. सिद्धेश म्हापसेकर, डॉ. संकेत निर्मळ, डॉ. अमोल पल्हाळ, डॉ. निखिल यादव, डॉ. मुकुंद नाळे आणि डॉ. ऋतिक राज या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने उपस्थित रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी केली. या शिबीराला परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

या कार्यक्रमाला माजी नगरसेविका शुभांगी सुकी, गीता सुकी, आनंद आळवे, रूपेश कुडतरकर, राजेश पनवेलकर, मिलींद सुकी, महेश म्हापसेकर, दीपक म्हापसेकर, गजा कोदे, महादेव गावडे, यश जीवने, प्रथमेश सुकी, विनू सुकी, सौ. सोनटक्के, इक्बाल शेख, अंकिता बांदेकर, ऋतिक कोरगावकर, आशा मुंज, सायली मुंज, प्रसाद म्हापसेकर आणि मयुरेश परब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संजय म्हापसेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.