कुणकेश्वरमध्ये ‘Tree of Life’चे आलिशान हॉटेल
भाजपकडून मांजरेकर नाका येथे घोषणा देत प्रकल्पाचे स्वागत पर्यटनाला चालना
स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार
देवगड : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन व धार्मिक स्थळ असलेल्या कुणकेश्वर येथे ‘Tree of Life’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या आलिशान हॉटेलची उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा होताच देवगडमध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त जल्लोष करत या प्रकल्पाचे स्वागत केले. देवगड शहरातील मांजरेकर नाका येथे घोषणा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
कुणकेश्वर येथे ५० खोल्यांचे आलिशान हॉटेल उभारण्यात येणार असून, हा प्रकल्प २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे देवगड तालुक्यातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्यासोबतच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. हॉटेल व्यवसायाबरोबरच स्थानिक व्यावसायिक, वाहतूक, खानावळ, पर्यटन सेवा, स्थानिक उत्पादने आणि विविध सेवा क्षेत्रांनाही याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
यावेळी माजी आमदार अजित गोगटे, बाळा खडपे, जिल्हा भाजपा सरचिटणीस संदीप साटम, योगेश चांदोस्कर, भाजपा शहराध्यक्ष वैभव करगुटकर, देवगड नगरपंचायत सभापती तन्वी चांदोस्कर, नगरसेवक शरद ठुकरूल, दयानंद पाटील, रोहन खेडेकर, तनवी शिंदे, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, गणपत गावकर, उमेश कणेरकर, व्ही. सी. खडपकर, सुभाष धुरी, उष:कला केळुसकर, ज्ञानेश्वर खवळे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
‘ताज’मुळे देवगडचे नाव जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक होईल : संदीप साटम
कुणकेश्वरसारख्या निसर्गरम्य आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठिकाणी ‘Tree of Life’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या आलिशान हॉटेलची उभारणी होत असल्याने देवगडच्या पर्यटन विकासाला नवी उंची मिळणार आहे. या प्रकल्पामुळे देवगडचे नाव जागतिक पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली देवगड तालुक्यात विविध विकासकामे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारत असून, तालुक्याला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम सुरू आहे. कुणकेश्वर येथे ‘ताज’सारख्या जागतिक दर्जाच्या ब्रँडचा प्रकल्प येणे ही देवगडच्या पर्यटन क्षेत्रासाठी अभिमानाची आणि महत्त्वपूर्ण बाब असल्याचे साटम यांनी सांगितले.
कुणकेश्वरचा समुद्रकिनारा, श्री क्षेत्र कुणकेश्वरचे धार्मिक महत्त्व आणि कोकणचे निसर्गसौंदर्य यांना जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची जोड मिळणार आहे. त्यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन हॉटेल, वाहतूक, खानावळ, स्थानिक उत्पादने, हस्तकला तसेच विविध सेवा व्यवसायांनाही चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
‘ताज’ हॉटेल हा केवळ पर्यटन प्रकल्प नसून देवगडच्या आर्थिक, सामाजिक आणि रोजगाराच्या विकासाला गती देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे देवगडच्या विकासाला मिळालेली ही नवी दिशा भविष्यात तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही संदीप साटम यांनी व्यक्त केला.












