करिअर कट्टाने घडविले युवा उद्योजक

  • कर्ले महाविद्यालयात ‘मैत्री’ स्टार्टअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उद्योजकतेकडे भरारी

 

शिरगांव ( प्रतिनिधी ):     

करिअर कट्टाअंतर्गत स्थापन केलेल्या बिझनेस क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ‘मैत्री’ स्टार्टअप सुरू करून उद्योजकतेकडे पहिले पाऊल टाकले आहे. विद्यार्थ्यांची कल्पकता, कौशल्य, संघभावना आणि व्यावसायिक दृष्टिकोन कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष गणपत तावडे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत ‘मैत्री’ स्टार्टअपचा शुभारंभ नुकताच पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयात गणपत तावडे यांच्या हस्ते झाला.

प्राचार्य समीर तारी यांनी शिक्षण, कौशल्य आणि उद्योजकतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वावलंबनाकडे वाटचाल करावी, असे सांगितले. ‘मैत्री अगरबत्ती’ स्टार्टअपचा शुभारंभ ओम गणेश मंदिरात विजयकुमार कदम यांच्या हस्ते करण्यात आला. करिअर कट्ट्यातून युवा उद्योजक घडतील, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम, संचालक हेमंत देसाई, अमित साटम, सुधीर साटम, विजयकुमार कदम, मुख्याध्यापक उदयसिंग रावराणे, प्राचार्य समीर तारी, प्रा. अक्षता मोंडकर, प्रा. कोमल पाटील, बिझनेस क्लब अध्यक्ष विराज लाड, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक सिद्दी सावळे यांनी केले, तर आभार सृष्टी पटेल यांनी मानले.