माजी विध्यार्थी चव्हाण कुटुंबीयांकडून ५० हजार रुपयांची देणगी
शिरगाव (प्रतिनिधी ): शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारत नूतनीकरणासाठी माजी विद्यार्थी डॉ. विवेक चव्हाण, त्यांचे बंधू सुनील चव्हाण व भगिनी शुभलक्ष्मी चव्हाण यांनी कुटुंबीयांच्या वतीने ५० हजार रुपयांचा धनादेश शाळेकडे सुपूर्द केला.
शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांकडून मिळत असलेला प्रतिसाद संस्थेवरील विश्वासाची पावती ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी देणगीचा योग्य व पारदर्शक वापर होईल, या विश्वासातून चव्हाण कुटुंबीयांनी शाळेच्या इमारत नूतनीकरणासाठी हे योगदान दिले.
यावेळी सरचिटणीस रघुनाथ चव्हाण, उपाध्यक्ष संभाजी साटम, गणपत तावडे, शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम, कार्यकारिणी सदस्य हेमंत देसाई, मिलिंद साटम, पंडित तावडे, अमित साटम, शाळा समिती सदस्य विश्राम लोके, सुधीर साटम, सत्यपाल लाडगावकर, संतोष तावडे तसेच प्रभारी मुख्याध्यापक उदयसिंग रावराणे उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांच्या या योगदानामुळे शाळेच्या विकासाला बळ मिळत असून, शाळेशी असलेले त्यांचे ऋणानुबंध आणि कृतज्ञतेची भावना पुन्हा अधोरेखित झाली आहे.












