आव्हानात्मक परिस्थितीवर मात करत राजापूर अर्बन बँकेची प्रगतीकडे वाटचाल

भविष्यात बँकेला गतवैभव प्राप्त करून देणार-एड. शशिकांत सुतार
पुढील वर्षी सभासदांना लाभांश देणार
पारदर्शक कारभाराची हमी देतानाच आता कोणत्याही चुकीला माफी नाही

राजापूर (प्रतिनिधी): गेल्या दोन वर्षात बँकेसमोर निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करताना सभासदांचा विश्वास व भक्कम पाठबळ, बँकेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांसह सहकारी संचालकांनी दिलेली साथ यामुळे पुन्हा एकदा बँकेने आपल्या प्रगतीकडे झेप घेतली आहे. भविष्यात सभासदांचे हित जोपासत बँकेची प्रगती साधताना अत्यंत पारदर्शकपणे कामकाज करून बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आंम्ही कटीबध्द असल्याची ग्वाही राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष एड. शशिकांत सुतार यांनी दिली आहे.
भविष्यातील कर्ज वसुली, कर्ज वितरण व बँकेच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीचे धोरण बँकेने निश्चित केलेले असुन ते आरबीआयला सादर केलेले आहे. त्यामुळे आरबीआयचे नियम व निर्देशांचे काटेकोर पालन करून कामकाज केले जाईल, बँकेच्या कार्यपध्दतीन कोणत्याही चुकीला माफी नाही असा स्पष्ट ईशाराही एड. सुतार यांनी दिला. तर गेली दोन वर्षे बँक तोटयात असल्याने सभासदांना लाभांश देता आलेला नाही, मात्र पुढील वर्षी बँक नफ्यात आणण्याचे ध्येय निश्चित करण्यात आलेले आहे, त्यामुळे पुढील वर्षी दोन वर्षे न दिलेल्या लाभांशाची कसर भरून काढली जाईर असेही एड. सुतार यांनी यावेळी नमुद केले.
राजापूर अर्बन बँकेच्या १०५ व्या सर्वसाधारण सभेचे रविवारी २७ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आर्थिक वर्षात बँकेने केलेल्या कार्यवाहीचा लेखाजोखा बुधवारी एड. सुतार यांनी पत्रकार परिषदेत मांडला.
सन २०२५-२६ हे बँकेसाठी काहीसे आव्हानात्मक राहिले. विशेषतः थकीत कर्जे, वाढलेला एन.पी.ए. आणि त्यानुसार करावी लागलेली नियामक तरतूद याचा बँकेच्या अंतिम आर्थिक निकालावर परिणाम झाला. मात्र, बँकेच्या नियमित बँकिंग व्यवसायातून सुमारे २ कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. म्हणजेच बँकेच्या मूळ बँकिंग कामकाजातून उत्पन्न निर्माण करण्याची क्षमता कायम आहे. परंतु एन.पी.ए. संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या नियमांनुसार रु. ७.५० कोटींपेक्षा जास्त तरतूद करावी लागल्याने अंतिम ताळेबंदात बँकेला तोटा दिसत आहे. बँकेसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे एन.पी.ए. कमी करणे आणि थकीत कर्जाची वसुली करणे. या बाबतीत गेल्या काही महिन्यांत आम्ही ठोस पावले उचलली आहेत. एप्रिल २०२६ पासून आजपर्यंत बँकेने सुमारे १३ कोटींची वसुली केली आहे. ही वसुली आमच्या वसुली मोहिमेला मिळालेले महत्त्वपूर्ण यश आहे. त्याचबरोबर थकीत कर्जदारांविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुमारे ५१ कोटींच्या थकीत कर्जासाठी वसुली दावे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर नोटिसा, पाठपुरावा आणि उपलब्ध असलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. आमचे धोरण अगदी स्पष्ट आहे- थकीत कर्जवसुलीसाठी प्रयत्न वाढवायचे, एन.पी.ए. कमी करायचा आणि बँकेची आर्थिक स्थिती मजबूत करायची असे असल्याचे एड. सुतार यांनी सांगितले.
सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे बँकेच्या ढोबळ एन.पी.ए. मध्येही लक्षणीय सुधारणा झाली आहे. मार्च २०२६ अखेरचा ढोबळ एन.पी.ए. सुमारे ६१.२९ कोटी होता. त्यानंतर वसुली, खात्यांचे नियमितीकरण आणि विविध उपाययोजनांमुळे ऑगस्ट २०२६ अखेर तो सुमारे ५२.६० कोटींवर आला आहे. म्हणजेच काही महिन्यांत एन.पी.ए. मध्ये जवळपास १९ कोटींची घट झाली आहे.
या संपूर्ण परिस्थितीत आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ठेवीदारांचा आणि सभासदांचा बँकेवरील कायम असलेला विश्वास. आर्थिक परिस्थिती आव्हानात्मक असतानाही ग्राहकांनी बँकेशी असलेले संबंध कायम ठेवले. सभासदांनी आणि ठेवीदारांनी दिलेला हा विश्वास आमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण हे बँकेचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
गेल्या काळातील अनुभव लक्षात घेऊन बँकेने नवीन कर्जवाटप करताना अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. आता आमचा भर केवळ कर्जे वाढवण्यावर नसून गुणवत्तापूर्ण वाढवण्यावर आहे. कर्जदाराची परतफेड क्षमता, कर्जाचा उद्देश, सुरक्षा आणि नियमानुसार आवश्यक तपासणी यांचा योग्य विचार करूनच कर्जवाटप करण्यावर भर दिला जात आहे.
यापुर्वी सभासदांना लाभांश दिलेला आहे. मात्र गेली दोन वर्षे तो देता आलेला नाही, मात्र पुढील वर्षी नक्कीच बँक नफ्यात आणून सभासदांना लाभांश देण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात मोठ्या प्रमाणावर कर्जवसुली करणे, ढोबळ आणि निव्वळ एन.पी.ए. सातत्याने कमी करणे, गुणवत्तापूर्ण कर्ज वाढवणे, खर्चावर नियंत्रण ठेवून ढोबळ नफा वाढवणे या उदिष्टयांवर काम करणार असल्याचे एड. सुतार यांनी सांगितले.
कर्ज वसुलीबाबत धडक मोहिम राबविताना सहकार कायदा १९६० कलम १०१ खाली दावे दाखल १६४, कलम ९१ अंतर्गत २८५, सिक्युरिटायझेशन अॅक्ट-४१, निगोसिबल इन्स्ट्रुमेंन्ट अॅक्ट कलम १३८ अंतर्गत १ असे सुमारे ५१ कोटींच्या कर्जवसुलीसाठी दावे दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बँकेने दहा लाखापर्यंत कर्जपुरवठा सुरू केला आहे. तर बँकेने स्वताची क्यू आर कोड सुविधा सुरू केली आहे.
नातेवाईक थकित कर्जप्रकरणी एका संचालकावर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे. तर सहकार विभागाच्या नवीन दहा वर्षापेक्षा अधिक काळ संचालक पद भूषविणाऱ्या संचालकांबाबत सहकार विभाग व आरबीआयकडून माहिती मागविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सभासद, ठेवीदार, ग्राहक, कर्मचारी आणि संचालक मंडळ यांच्या सामूहिक सहकार्याने राजापूर अर्बन बँक पुन्हा अधिक सक्षम, आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि विश्वासार्ह सहकारी बँक म्हणून आपले गतवैभवव प्राप्त करेल मला पूर्ण विश्वास आहे असेही एड. सुतार यांनी यावेळी नमुद केले.
या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष विवेक गादीकर, संचालक अनिल करंगुटकर, राजेंद्र कुशे, दिनानाथ कोळवणकर, विजय पाध्ये, प्रसाद मोहरकर, प्रतिभा रेडीज, सीईओ शेखरकुमार अहिरे, अधिकारी लक्ष्मण म्हात्रे, रमेश काळे, प्रसन्न खांबे आदी उपस्थित होते.