रत्नागिरी BREAKING : अवैध मासेमारीविरोधात मत्स्य विभागाची धडक कारवाई; तीन नौकांवर कारवाई

स्क्विड जिगिंग, LED वापरावर बडगा

रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्य विभागाकडून समुद्र तसेच किनारी भागात नियमित गस्त आणि तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत 22 सप्टेंबर 2026 रोजी रात्रीच्या गस्ती दरम्यान दोन स्क्विड जिगिंग नौका, तर 23 सप्टेंबर 2026 रोजी करला जेट्टी येथे एलईडी दिव्यांचा वापर करणारी एक नौका मत्स्य विभागाच्या निदर्शनास आली. या तिन्ही नौकांवर विभागामार्फत नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

22 सप्टेंबर रोजी रात्रीच्या गस्तीमध्ये Sania Hafsa या नौकेवर कारवाई करण्यात आली. या नौकेचा नोंदणी क्रमांक IND-MH-04-MM-3851 असून मालक श्री. सिकंदर जैनुद्दीन फणसोपकर आहेत. त्याचप्रमाणे H. Simak या स्क्विड जिगिंग नौकेवरही कारवाई करण्यात आली असून तिचा नोंदणी क्रमांक IND-MH-04-MM-601 आहे. या नौकेच्या मालक श्रीमती सुलताना अख्तर होडेकर आहेत.

त्यानंतर 23 सप्टेंबर रोजी करला जेट्टी येथे तपासणीदरम्यान Guruprasad नावाची नौका आढळून आली. नोंदणी क्रमांक IND-MH-04-MM-3766 असलेल्या या नौकेवर एलईडी दिवे बसविण्यात आल्याचे तपासणीत निदर्शनास आले. या नौकेच्या मालक श्रीमती सुगंधा सुरेश ताकले असून, सदर नौकेवरही मत्स्य विभागाकडून नियमानुसार कारवाई करण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र, जेट्टी आणि बंदर परिसरात अवैध मासेमारीचे प्रकार रोखण्यासाठी गस्त, तपासणी आणि कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे मत्स्य विभागाने स्पष्ट केले आहे. मत्स्य व्यवसायातील नियमांचे पालन करूनच मासेमारी करण्याचे आवाहनही विभागाकडून करण्यात आले आहे.