दाणोलीतील तरुणांनी पोलिसांकडे सुपूर्द केले ट्रक चालकाचे पाकीट

प्रामाणिकपणाचा आदर्श : सावंतवाडी पोलिसांकडून विशेष सन्मान

​सावंतवाडी:
रस्त्यात सापडलेले पैशांचे पाकीट अत्यंत प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन करत दाणोली येथील युवकांनी सामाजिक बांधिलकी आणि प्रामाणिकपणाचा उत्कृष्ट आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने या युवकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

​मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा येथील एक ट्रक चालक आपल्या ट्रकमधून गोवा ते तेलंगणा असा प्रवास करत असताना दाणोली येथे त्यांचे पैशांचे आणि महत्त्वाच्या कागदपत्रांचे पाकीट रस्त्यावर पडले होते. दरम्यान, दाणोली येथील स्थानिक तरुण वसंत बिले यांना हे पाकीट रस्त्यात सापडले. पाकीट मिळताच त्यांनी कसलाही मोह न धरता आपल्या सहकाऱ्यांना ही बाब सांगितली. त्यानंतर वसंत बिले, तेजस स्वार आणि दीप्तेश सुकी या मित्रांनी पुढाकार घेत हे पाकीट तात्काळ सावंतवाडी पोलिसांकडे सुपूर्द केले.

​पाकिटाची पाहणी केली असता त्यात रु. ४,२०० ची रोकड आणि अत्यंत महत्त्वाची वैयक्तिक कागदपत्रे होती. पोलिसांनी संबंधित पाकीट मालकाचा शोध घेतला असता ते तेलंगणा येथील असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित ट्रक चालकाशी संपर्क साधला असता, त्यांनी लांबचा प्रवास असल्याने पाकीट कुरिअरद्वारे पाठवण्याची विनंती केली. त्यानुसार पोलिसांनी सर्व रक्कम व कागदपत्रांसह ते पाकीट संबंधित मालकाला कुरिअरद्वारे सुरक्षितपणे पाठवून दिले. आपले हरवलेले पाकीट सर्व ऐवजासहित परत मिळाल्याने तेलंगणा येथील ट्रक चालकाने सावंतवाडी पोलीस आणि दाणोलीच्या तरुणांचे मनापासून आभार मानले. दाणोलीतील वसंत बिले, तेजस स्वार आणि दीप्तेश सुकी या तरुणांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्वस्तरातून कौतुक होत असून सावंतवाडी पोलिसांनीही या युवकांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.