हिंदळे मोरवे येथील मारहाणीची परस्पर विरोधी तक्रार दाखल

देवगड/ प्रतिनिधी
हिंदळे मोर्वेवाडी येथील मारहाणीच्या घटनेची परस्परविरोधी फिर्याद बुधवारी रात्री उशिरा दाखल झाली असून सख्ख्या भावजयला मारहाण केल्याप्रकरणी देवगड पोलीस स्थानकात बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदळे मोर्वेवाडी येथील संशयित संतोष अनंत धुरत (वय 45) व त्यांची भावजय प्रिया शंकर धुरत (45) यांच्यात जमीन जागेवरून वाद आहेत. बुधवारी सकाळी 8 वा. च्या सुमारास प्रिया धुरत या घराबाहेर तुळशीची पूजा करीत असताना तेथे आलेल्या संशयित संतोष धुरत याने त्यांच्याशी जमीन जागेवरून वाद केले. यावेळी संशयित संतोष याने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने प्रिया यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर व डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली. तर संशयित संतोष याचा मुलगा आकाश संतोष धुरत (22) याने प्रिया यांच्या पायावर लाकडी दांड्याने मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी प्रिया धुरत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित संतोष धुरत व आकाश धुरत यांच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता 118 (1), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे करीत आहेत.