कुडाळमध्ये २७ सप्टेंबर, कणकवलीत २८ सप्टेंबर रोजी आयोजन
हृदयविकार, मुतखडा, प्रोस्टेट, पित्ताशयातील खडे, मणक्यांचे आजार याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी सनराईज हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात शनिवार, दि. २७ सप्टेंबर रोजी, तर कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात रविवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर होणार आहे.
या शिबिरामध्ये हृदयविकार, मुतखडा, प्रोस्टेट, पित्ताशयातील खडे, व्हेरिकोस व्हेन्स तसेच मणक्यांच्या विविध आजारांबाबत नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून, पुढील उपचार व आवश्यक शस्त्रक्रियांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना विविध उपचारांचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये एन्जिओप्लास्टी, लहान छिद्रातून बायपास ऑपरेशन, दुर्बिणीद्वारे मुतखडा व प्रोस्टेटवरील उपचार, पित्ताशयातील खड्यांवरील शस्त्रक्रिया, लेझरद्वारे व्हेरिकोस व्हेन्सवरील उपचार तसेच मणक्यांवरील शस्त्रक्रिया याबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याशिवाय थायरॉईडच्या गाठी, गर्भाशयातील गाठी यांसह विविध आजारांवरील उपलब्ध उपचारपद्धतींबाबतही तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध आजारांनी त्रस्त असलेल्या तसेच पुढील उपचार किंवा शस्त्रक्रियेबाबत माहिती घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कुडाळ येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावना तेलंग आणि कणकवली येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील यांची शिबिराला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मसुरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शिबिरासाठी येताना नागरिकांनी रेशन कार्ड, आधार कार्ड, आयुष्यमान कार्ड तसेच यापूर्वीचे वैद्यकीय रिपोर्ट उपलब्ध असल्यास ते सोबत आणावेत. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी ८९२८७३२०७३६९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.












