कणकवली पोलिसांची धडक कारवाई! शेअर मार्केटमध्ये अधिक नफ्याचे आमिष दाखवून महिलेला लुटणारा भामटा गजाआड

कणकवली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत १२ लाख २७ हजार ८०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सुमारे दहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या आरोपीला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले. संदीप अंकुश पाटील (वय ३५, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

कणकवली येथील एका महिला फिर्यादीशी आरोपीने ओळख करून घेत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दि. १८ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून दि. २४ जून २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून १२ लाख २७ हजार ८०० रुपये गुंतवणुकीच्या नावाखाली घेतले. मात्र, सदर रक्कम परत न करता तिची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

याप्रकरणी फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कणकवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८, ३१८(४) अन्वये दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी संदीप पाटील हा सुमारे दहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत वेगवेगळ्या ठिकाणी व पत्त्यावर राहून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी कणकवली पोलिसांकडून तपास सुरू होता. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक व तपास कौशल्याचा वापर करून पोलिस पथकाने आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला.

दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी पारगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथून आरोपी संदीप पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार तसेच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे, पांडुरंग पांढरे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा कांबळे यांच्या पथकाने सहभाग घेतला. तांत्रिक कौशल्य व तपास कौशल्याचा वापर करून सुमारे दहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला शोधून काढल्याबद्दल कणकवली पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.