नांदगावात पार्क केलेली दुचाकी चोरीला

त्याच रस्त्यावर नंबर प्लेट नसलेली बेवारस दुचाकी सापडली

 

एकाच दिवशी घडलेल्या दोन्ही घटनांमुळे चोरट्याच्या हालचालींबाबत संशय

 

पोलिसांकडून तपास सुरू

 

कणकवली : तालुक्यातील नांदगाव येथे शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास नांदगाव तिठा-फोंडा रस्त्यालगत पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत नांदगाव खालची मुस्लिमवाडी येथील समीर खुदबुद्दीन नावलेकर यांनी कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

 

समीर नावलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास नांदगाव तिठा येथे त्यांच्या मालकीची काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी (एमएच ०७ एए ४१३९) घेऊन आले होते. दुचाकी रस्त्यालगत पार्क करून ते नमाज पठण करण्यासाठी गेले होते. रात्री सुमारे ९.४५ वाजता ते परत आले असता, ज्या ठिकाणी दुचाकी पार्क केली होती, त्या ठिकाणी दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी परिसरात बराच वेळ शोध घेतला; मात्र दुचाकी सापडली नाही. त्यानंतर त्यांनी कणकवली पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली.

 

दरम्यान, याच रस्त्यालगत एक काळ्या रंगाची दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आली. याबाबत नांदगावच्या पोलिस पाटील वृषाली मोरजकर यांनी कासार्डे बीटचे पोलिस कर्मचारी चंद्रकांत झोरे यांना माहिती दिली. सदर दुचाकीच्या दोन्ही बाजूंच्या नंबर प्लेट काढून टाकण्यात आल्याचे आढळून आल्याने या दुचाकीबाबत संशय निर्माण झाला.

 

यानंतर कासार्डे बीटचे चंद्रकांत झोरे तसेच श्री. जाधव यांनी नांदगाव येथे येऊन सदर दुचाकीच्या चेसिस नंबरच्या आधारे तिच्या मालकाचा शोध घेतला. तपासात ही दुचाकी सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथील असल्याचे समोर आले. तसेच संबंधित मालकाने आपली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार तेथील पोलिस ठाण्यात दाखल केल्याची माहिती मिळाली.

 

एकीकडे नांदगाव तिठा येथे पार्क केलेली समीर नावलेकर यांची दुचाकी चोरीला जाणे आणि त्याच दिवशी याच रस्त्यालगत नंबर प्लेट काढलेली दुसरी चोरीची दुचाकी बेवारस अवस्थेत आढळून येणे, या दोन्ही घटनांमुळे पोलिसांसमोर तपासाची नवी दिशा निर्माण झाली आहे. एका चोरीच्या दुचाकीचा वापर करून चोरट्याने ती दुचाकी नांदगाव येथे टाकून दुसरी दुचाकी घेऊन पलायन केले असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

 

एकाच दिवशी आणि एकाच परिसरात घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे नांदगाव परिसरात खळबळ उडाली असून, या दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचा तपास कणकवली पोलिसांकडून करण्यात येत आहे.