‘शाहू सर्कलचा महाराजा’ रिल स्पर्धेत सावंतवाडीच्या साईश गावडेचे सलग तिसऱ्या वर्षी यश

सावंतवाडी । प्रतिनिधी :आपल्या गुणवत्तेची आणि सर्जनशीलतेची छाप कोल्हापूरच्या भूमीत उमटवत सावंतवाडी येथील साईश गावडे याने पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कोल्हापूर येथील प्रसिद्ध ‘शाहू सर्कलचा महाराजा’ रिल स्पर्धेत साईशने यंदा तृतीय क्रमांक पटकावत सलग तिसऱ्या वर्षी अव्वल तीन विजेत्यांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण आणि चमकदार कामगिरीमुळे सावंतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

साईश गावडे हा सध्या कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओथेरपीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. सन २०२४ मध्ये फिजिओथेरपीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतल्यानंतर त्याने ‘शाहू सर्कलचा महाराजा’ रिल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग नोंदवला होता. आपल्या पहिल्याच सहभागात त्याने थेट प्रथम क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर २०२५ च्या स्पर्धेत त्याने तृतीय क्रमांक आणि आता २०२६ मधील स्पर्धेतही पुन्हा तृतीय क्रमांक मिळवून आपल्या यशाची मालिका यशस्वीरीत्या कायम ठेवली आहे.

सलग तीन वर्षे या प्रतिष्ठित स्पर्धेत अग्रक्रमी यश मिळवणे ही साईशच्या सर्जनशीलतेला, मेहनतीला आणि सातत्याला मिळालेली मोठी पावती मानली जात आहे. त्याच्या या कामगिरीमुळे कोल्हापुरात पुन्हा एकदा सावंतवाडीच्या प्रतिभेचा डंका वाजला असून सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, वैद्यकीय शिक्षणासोबतच सर्जनशील क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा साईश सध्या ऑल इंडिया फिजिओथेरपी कॉन्फरन्सनिमित्त दिल्ली येथे गेला आहे. शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांच्या या परिषदेत देशभरातील नामवंत फिजिओथेरपिस्ट मार्गदर्शन करणार आहेत. शिक्षण आणि कला अशा दोन्ही क्षेत्रांत उत्तम समन्वय साधत वाटचाल करणाऱ्या साईश गावडे याचे सावंतवाडीकरांकडून मनःपूर्वक अभिनंदन केले जात असून त्याच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.