मदन मोडक, हेमंत तांबे यांच्या संकल्पनेतून २० ते २५ एकरांवर वृक्षलागवड; संकल्पसिद्धी सोहळा उत्साहात संपन्न
देवरूख (प्रतिनिधी):
वाढती वृक्षतोड आणि त्यातून निर्माण होणारे पर्यावरणीय प्रश्न लक्षात घेऊन देवरूख येथील प्रगतीशील शेतकरी मदन मोडक आणि शेतीतज्ज्ञ हेमंत तांबे यांच्या संकल्पनेतून संगमेश्वर तालुक्यातील कुडवली येथील सांदिपनी गुरुकुल संस्थेच्या जागेत तब्बल ६२०० वृक्षांची जंगलनिर्मिती करण्यात आली. या वृक्षलागवडीचा संकल्पसिद्धी सोहळा सांदिपनी गुरुकुल संस्थेचे ट्रस्टी महेश आरस व सौ. सुनीता महेश आरस यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पार पडला.
यावेळी वृक्षप्रेमी व दानशूर व्यक्ती मदन मोडक, सौ. मोडक, शेतीतज्ज्ञ हेमंत तांबे, युयुत्सू आर्ते, ज्येष्ठ पत्रकार सुरेश सप्रे, देवरूख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत, नगरसेवक रूपेश भागवत, शामकांत अळवणी आदी मान्यवर उपस्थित होते. मदन मोडक यांनी या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे परिसरातील डोंगर उघडे-बोडके होत असून त्याचा परिणाम पर्यावरण, हवामान आणि पर्जन्यमानावर होत आहे. प्रत्येक ठिकाणी होणारी वृक्षतोड प्रत्यक्ष थांबवणे शक्य नसले तरी त्याला पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात नवीन वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प आपण करू शकतो.
याच उद्देशाने दरवर्षी शक्य होईल तेवढी झाडे लावण्याचा संकल्प मोडक आणि तांबे यांनी केला. मात्र वृक्षलागवडीसाठी योग्य जागा मिळणे हे मोठे आव्हान होते. अखेर सांदिपनी गुरुकुल संस्थेशी संपर्क साधल्यानंतर संस्थेने त्यांच्या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत कुडवली येथील २० ते २५ एकर जागेत वृक्षलागवडीस परवानगी दिली. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या या कामात जूनपर्यंत ६२०० वृक्षांची लागवड पूर्ण करण्यात आली. शेतीतज्ज्ञ हेमंत तांबे गेल्या चार ते पाच वर्षांपासून कोकणातील शेतकरी, संस्था आणि ग्रामपंचायतींना फळझाडे तसेच जंगलनिर्मितीसाठी आवश्यक असलेली विविध प्रकारची रोपे विनामूल्य देत आहेत. दरवर्षी सुमारे ५० हजार रोपे स्वतःच्या खर्चाने तयार करून ती लोकांना लागवडीसाठी देण्याचे काम ते करत आहेत.
या उपक्रमासाठी आवश्यक असलेली रोपेही तांबे यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली. वृक्षलागवडीच्या या संकल्पात ते मोडक यांच्यासोबत सक्रियपणे सहभागी झाले. वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदणे, रोपे तयार करणे, त्यांची निगा राखणे आणि लागवड करणे यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता होती. कामगारांची उपलब्धता कमी असतानाही मोडक आणि तांबे यांनी हा उपक्रम पुढे नेला. रोपांची निर्मिती आणि संपूर्ण लागवड प्रक्रियेसाठी दोघांनी मिळून सुमारे सहा लाख रुपये खर्च केल्याचे मदन मोडक यांनी सांगितले. यंदा किमान पाच हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात ६२०० वृक्षांची लागवड पूर्ण करण्यात आली. यामध्ये रायवळ आंबा, जांभूळ, कोकम, फणस, बकुळ यांसारख्या कोकणातील फळझाडांसह वड, पिंपळ, बहावा, शिवण आदी जंगलनिर्मितीस उपयुक्त असलेल्या दहा ते बारा प्रकारच्या वृक्षांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सांदिपनी गुरुकुलच्या आवारातील तसेच डोंगर परिसरातील जुन्या वृक्षांना कोणताही धक्का न लावता, उपलब्ध मोकळ्या जागेतच नव्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. जुन्या वृक्षांचे संरक्षण आणि नव्या वृक्षांची निर्मिती या दोन्हींचा समतोल साधत हा उपक्रम राबविण्यात आल्याचे मोडक यांनी सांगितले.












