बाजारपेठ गजबजली; व्यापारी, शेतकरी, एसटी आणि सेवा क्षेत्राला मोठा दिलासा
संतोष सावर्डेकर/ चिपळूण: विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाने चिपळूण तालुक्यात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असतानाच गणेशोत्सवाने स्थानिक अर्थचक्रालाही मोठी गती दिली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने चिपळूण शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली. सोने-चांदीची दुकाने, वस्त्रदालने, पूजा साहित्य, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सजावटीचे साहित्य, फळे, मिठाई तसेच विविध खाद्यपदार्थांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता स्थानिक व्यापार-व्यवसायासाठी महत्त्वाचा आर्थिक पर्व ठरला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणरायाच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. नवीन कपडे, पूजेचे साहित्य, फुलांची सजावट, विद्युत रोषणाई, घरगुती वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल अॅक्सेसरीज तसेच विविध भेटवस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. विशेष म्हणजे ऑनलाइन खरेदीचा प्रभाव वाढत असतानाही ग्राहकांनी स्थानिक दुकानदार आणि बाजारपेठेला दिलेले प्राधान्य व्यापाऱ्यांसाठी सकारात्मक संकेत मानले जात आहेत.
गणेशोत्सवाचा थेट लाभ ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही झाला. तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या काकडी, चिबूड, दोडके, पडवळ यांसारख्या भाजीपाला व फळभाज्यांना उत्सवकाळात मोठी मागणी होती. गणेशोत्सवातील उपवास, नैवेद्य तसेच पाहुणचारासाठी या उत्पादनांची मागणी वाढल्याने शेतकरी वर्गाला चांगले उत्पन्न मिळण्यास मदत झाली. त्यामुळे शहरातील बाजारपेठ आणि ग्रामीण भागातील शेतीव्यवस्था यांच्यातील आर्थिक संबंध गणेशोत्सवाच्या काळात अधिक ठळकपणे समोर आले.
एसटीला वाढता प्रवासी प्रतिसाद
गणेशोत्सवानिमित्त मुंबई, पुणे आणि अन्य शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या कोकणवासीयांनी मोठ्या संख्येने चिपळूण व परिसरातील आपल्या गावांकडे धाव घेतली. ही वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन चिपळूण मध्यवर्ती एसटी आगाराने जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले होते. आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या नियोजनामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला.
गणेशोत्सवाच्या काळात एसटीबरोबरच खासगी आराम बसेस, खासगी वाहने आणि अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही मोठा ताण होता. मात्र, विविध मार्गांवर अतिरिक्त वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याने कोकणात दाखल होणाऱ्या गणेशभक्तांची वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत झाली. वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे एसटीच्या उत्पन्नातही भर पडली.
कोकण रेल्वेवर गर्दीचा उच्चांक
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने कोकण रेल्वे मार्गावरही मोठी गर्दी झाली. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्या होत्या. रेल्वे, एसटी आणि खासगी वाहतूक या तिन्ही माध्यमांवर गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात प्रवासी दिसून आले. काही ठिकाणी रेल्वे वाहतुकीला विलंबाचा फटका बसला असला तरी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा उत्साह मात्र कायम राहिला.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे काही भागांत प्रवासाचा वेग वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात रस्ते, रेल्वे आणि एसटी या तिन्ही वाहतूक माध्यमांतून कोकणात दाखल झालेल्या नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
पोलिसांच्या नियोजनामुळे उत्सव शांततेत
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले आणि पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बंदोबस्ताचे योग्य नियोजन केले. गर्दीची ठिकाणे, विसर्जन मिरवणुका, वाहतूक व्यवस्था या भागांवर लक्ष ठेवण्यात आल्याने गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यास मदत झाली.
विसर्जन व्यवस्थेत नगरपरिषदेचे योगदान
नगराध्यक्ष उमेश सकपाळ मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशमूर्ती विसर्जनासाठी चिपळूण नगरपरिषदेने विविध विसर्जन घाट आणि परिसराची स्वच्छता तसेच आवश्यक व्यवस्था केली गेली होती. बहादूरशेखनाका परिसरात गणेश विसर्जनासाठी तात्पुरत्या स्वरूपात आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या. या कामासाठी पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना काही प्रमाणात सुविधा उपलब्ध झाली.
एकंदरीत पाहता, यंदाचा गणेशोत्सव चिपळूण तालुक्यासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा महत्त्वाचा कालखंड ठरला. बाजारपेठेतील वाढलेली उलाढाल, शेतमालाला मिळालेली मागणी, एसटी व खासगी वाहतुकीला मिळालेला प्रवासी प्रतिसाद, कोकण रेल्वेवरील गर्दी आणि विविध सेवा क्षेत्रांमध्ये झालेली आर्थिक हालचाल यामुळे गणेशोत्सवाने तालुक्याच्या अर्थचक्राला गती दिली. व्यापारी, शेतकरी, वाहतूकदार, छोटे व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातील घटकांसाठी हा उत्सव दिलासादायक ठरल्याचे चित्र आहे. गणरायाच्या आगमनाने भक्तीची ऊर्जा निर्माण केलीच; त्याचबरोबर स्थानिक बाजारपेठेतही आर्थिक चैतन्य निर्माण केले.











