दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते तिरुवनंतपुरम उत्तर तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोडदरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या धावणार आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस–तिरुवनंतपुरम उत्तर विशेष गाडी
गाडी क्रमांक 01463 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर गुरुवारी दुपारी ४ वाजता सुटणार आहे. ही गाडी १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत धावेल. दुसऱ्या दिवशी रात्री ११.३० वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01464 तिरुवनंतपुरम उत्तर येथून दर शनिवारी दुपारी २.१५ वाजता सुटणार आहे. ही गाडी १७ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०२६ दरम्यान धावेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बायंदूर, कुंदापुरा, उडुपी, सुरतकल, मंगळुरू, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, तिरूर, शोरनूर, त्रिशूर, अलुवा, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, चंगनाशेरी, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलिकरा, कायंकुलम, शास्तांकट्टा, करुनागापल्ली, कोल्लम आणि वर्कला शिवगिरी येथे थांबे असतील.
या गाडीला एकूण २२ डबे असतील. त्यात ३-टियर एसीचे ४, स्लीपरचे ११, जनरलचे ५ आणि एसएलआरचे २ डबे असतील.
लोकमान्य टिळक टर्मिनस–सावंतवाडी रोड विशेष गाडी
गाडी क्रमांक 01179 लोकमान्य टिळक टर्मिनसहून दर शुक्रवारी सकाळी ८.२० वाजता सुटणार आहे.
मान्सून वेळापत्रकानुसार ही गाडी ९ ते १६ ऑक्टोबर २०२६ दरम्यान धावेल आणि रात्री १०.१० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. परतीची 01180 गाडी सावंतवाडी रोडहून रात्री ११ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
मान्सूननंतरच्या वेळापत्रकानुसार २३ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत 01179 गाडी सकाळी ८.२० वाजता सुटून रात्री ८.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. परतीची 01180 गाडी रात्री १० वाजता सावंतवाडी रोडहून सुटणार आहे.
या गाड्यांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, थिवीम आणि करमळी येथे थांबे असतील.
या विशेष गाडीत एकूण २४ एलएचबी डबे असतील. त्यात फर्स्ट एसी १, सेकंड एसी ४, थर्ड एसी ८, स्लीपर ८, पॅन्ट्री कार १ आणि जनरेटर कार २ डबे असतील.
गाडी क्रमांक 01180 चे आरक्षण २८ सप्टेंबर २०२६ पासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट तसेच IRCTC संकेतस्थळावर सुरू होणार आहे.
दिवाळीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता या विशेष रेल्वे सेवांचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.












