पळसंबच्या ओढ्यात अवतरला नौकाविहाराचा आनंद!

▪️श्री जयंतीदेवी मंडळाच्या उपक्रमाचे उत्साहात उद्घाटन

▪️प स सदस्य गणेश तोंडवळकर यांचे विशेष योगदान 

मसुरे | झुंजार पेडणेकर 

मुंबई-पुण्यासारख्या धावपळीच्या शहरांतून सुट्टीसाठी पळसंब येथे गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या मुलांना आणि स्थानिक बालगोपाळांना गावच्या निसर्गाचा मनमुराद आनंद घेता यावा, या उद्देशाने ‘श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ’ आणि दानशूर व्यक्तिमत्त्व पंचायत समिती सदस्य श्री. गणेश तोंडवळकर यांच्या संयुक्त विद्यमाने गावात ‘नौकानयन उपक्रमा’चा शुभारंभ करण्यात आला.

अनंत चतुर्दशीच्या पावन मुहूर्तावर आयोजित या सोहळ्यामुळे संपूर्ण पळसंब गावात एक वेगळेच चैतन्य पसरले होते. दोन बाजूला हिरवेगार डोंगर आणि मध्यमातून वाहणारा नैसर्गिक ओढा, अशा निसर्गरम्य वातावरणात उपलब्ध करून देण्यात आलेल्या होडीमुळे उपस्थितांना नौकाविहाराचा अद्वितीय आनंद लुटता आला.

या दिमाखदार उद्घाटन प्रसंगी गावातील तसेच मुंबईस्थित ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. दिगंबर साटम, श्री. गिरिधर पुजारे, श्री. दीपक नाखरे, श्री. विलास सावंत, देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री. रमेश परब, मंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास सावंत, सचिव व पळसंब गावचे सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद सावंत, दादा पुजारे, बाबा सावंत, राजा सावंत, हरिश सावंत, सचिन सावंत, मिलिंद सावंत, संजय परब, पिंट्या सावंत, श्याम सावंत, प्रशांत सावंत यांच्यासह अनेक ग्रामस्थ, मुंबईकर चाकरमानी व बच्चे कंपनी उपस्थित होती.

उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थितांनी नौकाविहाराचा आनंद घेतला. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ ग्रामस्थ श्री. गिरिधर पुजारे यांनी बालपणी केळीच्या खांबापासून तयार केलेल्या होडीच्या आठवणींना उजाळा दिला. श्री. दिगंबर साटम यांनी मंडळाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मनापासून कौतुक करत शुभेच्छा दिल्या. तसेच श्री. दीपक नाखरे आणि श्री. रमेश परब यांनीही या संकल्पनेचे स्वागत करत उपक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद सावंत यांनी केले.

गुणग्रहाण आणि आभार प्रदर्शन

गावातील बाल गोपाळांसाठी आणि पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या या होडीची उपलब्धता करून दिल्याबद्दल मंडळाच्या वतीने दानशूर श्री. गणेश तोंडवळकर यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला आलेल्या सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था श्री. दिगंबर साटम यांच्या वतीने करण्यात आली होती.

हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पळसंबमधील स्थानिक तरुण मंडळींनी विशेष मेहनत घेतली. निसर्गाशी मैत्री साधणारा हा उपक्रम पळसंब गावच्या वैभवात नक्कीच भर घालेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.