मसुरे | झुंजार पेडणेकर :पळसंब गावठाण येथे ‘देव माझा निसर्गाचा राजा’ या संकल्पनेअंतर्गत गणेशोत्सवाच्या काळात निर्माल्यापासून कंपोस्ट खत निर्मितीचा पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित करण्यात आला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पळसंब गावठाण येथील दोन्ही विसर्जन स्थळांवर या उपक्रमाला भाविकांचा १०० टक्के पाठिंबा मिळाला.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी आलेल्या भाविकांनी निर्माल्य पाण्यात न सोडता ते स्वतंत्रपणे संकलित करण्यास सहकार्य केले. संकलित केलेल्या निर्माल्याचे पुढे योग्य पद्धतीने वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर या निर्माल्यावर आवश्यक प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय कंपोस्ट खत तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
धार्मिक श्रद्धेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे निर्माल्यामुळे जलप्रदूषण होण्यास आळा घालण्यास मदत होणार आहे. तसेच निर्माल्याचा पुनर्वापर करून त्यापासून उपयुक्त सेंद्रिय खत निर्मिती करण्याचा आदर्श गावकऱ्यांसमोर ठेवण्यात आला आहे.
या उपक्रमासाठी श्री जयंती देवी रवळनाथ पंचायतन देवस्थान ट्रस्ट तसेच श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांचे सहकार्य लाभले. भाविकांनी उत्स्फूर्तपणे दिलेल्या प्रतिसादामुळे ‘देव माझा निसर्गाचा राजा’ हा उपक्रम पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरले. यासाठी
रोशन चिंचवलकर,
प्रमोद सावंत,
बबलु सावंत,
प्रथमेश सावंत आणि
गावातील ग्रामस्थ यांचे मोठे सहकार्य लाभले.












