कुडाळ शहरात दुचाकी गॅरेजला भीषण आग

लाखो रुपयांचे नुकसान

कुडाळ: प्रतिनिधी

कुडाळ शहरातील कृष्णाई सुपर मार्केटसमोर असलेल्या सुलभ शौचालयाच्या बाजूला असलेल्या दुचाकी गॅरेजला आज संध्याकाळी ६.४५ च्या सुमारास अचानक आग लागण्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच कुडाळ नगरपंचायतचा अग्निशमन बंब तत्काळ दाखल होत गॅरेजला लागलेली आग विझविण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, कुडाळ शहरातील कृष्णाई सुपर मार्केटसमोर असलेल्या सुलभ शौचालयाच्या बाजूला संजय सोमा सावंत (मूळ: सोनवडे, रा. पिंगुळी म्हापसेकर तिठा)
यांचे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज असून आज सोमवार असल्याने ते बंद होते. संध्याकाळी ६.४५ च्या सुमारास गॅरेजला आग लागल्याची घटना घडली. ही आग कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, या दुर्घटनेत अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, या आगीत गॅरेजमधील दुरुस्ती साहित्य, ऑइल तसेच गॅरेज शेडवरील पत्रे जळून खाक झाले. सदर घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात कुडाळवासियांनी घटनास्थळी धाव घेतली. कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेविका नयना मांजरेकर, नगरपंचायत मुख्य अधिकारी खंडू पवळ, नगरसेवक मंदार शिरसाट, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक अभिषेक गावडे, अभय शिरसाट, श्रीराम शिरसाट, अवधूत शिरसाट, बंड्या शिरसाट, आबा धडाम, सतीश साळगावकर आदी उपस्थित होते. यावेळी नुकसानग्रस्त संजय सावंत यांना नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरसाट, नगरसेवक मंदार शिरसाट, नगरसेवक अभिषेक गावडे, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी तत्काळ आर्थिक मदत सुपूर्द केली.

सदर गॅरेजला आग लागल्यानंतर कुडाळ नगरपंचायतचे अग्निशमन दलाचे कर्मचारी वाहनचालक संजय टेंबुलकर, फायरमन गोट्या कोरगावकर, गजानन पेडणेकर आणि सतीश जाधव यांनी प्रसंगावधान दाखवीत अग्निशमन बंबासमवेत घटनास्थळी हजेरी लावली.